Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करताना ‘कशाचा ढेकळाचा पंचनामा करायचा का?’ असे संतापजनक विधान केले होते. यावरून टीका होत असतानाच आता माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी आता कृषी खाते ओसाड गावची पाटीलकी वाटू लागली आहे. कोकाटे यांचे यासंदर्भातील आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे’, असे विधान त्यांनी शुक्रवारी (दि. ३०) छत्रपती संभाजीनगरमध्ये केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले. कृषिमंत्रिपद म्हणजे तशी ओसाड गावची पाटीलकी. अजित पवारांनी मला हे मंत्रिपद दिले. मात्र, त्यामध्येही चांगले काम करता येते. कृषिक्षेत्रात महाराष्ट्र अव्वल आहे. आगामी काळात आणखी चांगले काम करायचे आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, असे विधान केले आहे. सध्या शेतात कपाशी नाही, सोयाबीन नाही. आता फळबागा उभ्या आहेत आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, माझ्या शब्दाचा अर्थ तुम्ही वेगळा घेता त्याला मी काय करू? आता ज्या शेतात काहीही नाही तेथील पंचनामे करून काय करणार? असे कोकाटे म्हणालेले आहेत.

हेही वाचा –  नळ कनेक्शन तोडण्याची हुकूमशाही कारवाई करू नका

जपून वक्तव्य करा; आमदार सदाभाऊ खोत

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  वेगवेगवळे मंत्री नुकसानीचे पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. शेतकर्‍यांच्या बाबतीत संवेदना बाळगून काम करणे आवश्यक आहे. एखाद्या पदावर गेल्यावर आपले काम नेमके काय आहे, काय आपली दिशा आहे हे स्पष्ट असणे गरजेचे आहे. कृषिमंत्र्यांनीही शेतकर्‍यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावे, असे ते म्हणालेत.

माणिकराव कोकाटेंना समज द्या; हर्षवर्धन सपकाळ

माझ्या मंत्रिमंडळातील कोणालाही चुकीचे काम करू देत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. पण त्यांचेच सहकारी माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करून शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आधी या मंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात अशी मुक्ताफळे उधळली आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का? असा उद्धट प्रश्न केला आहे. या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मंत्र्याला समज द्यावी. अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

मंत्री झाल्यावर फार बोलायचे नसते: विखे पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या बोलघेवडेपणामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री झाल्यावर फार बोलायचे नसते. माणिकराव कोकाटे यांच्या मनात काही नसते. पण ते फटकळपणे बोलतात. त्यावरून वाद होतो, असे ते म्हणाले आहेत. ‘मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते. माणिकराव कोकाटे हे मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही नसते. पण ते फटकळपणे बोलतात. मित्र म्हणून मी त्यांना मोजके बोलण्याचा सल्ला देईन’, असे राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी (दि. ३१) पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम: रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. नेहमी वादग्रस्त विधाने करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की, शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे संतप्त विधान करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे कृषिमंत्री महाशय करत आहेत. राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसाने ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका हा कांदा, फळबाग आणि भाजीपाला पिकांना बसला. कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल ७ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाले असून हे कृषिमंत्र्यांनी बांधावर जाऊन बघावे. कायमच वादग्रस्त बोलणाऱ्या या मंत्र्याला संवेदनशीलतेने बोलण्याचा धडा देण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button