राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत…”

Tejaswi Ghosalkar : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभाप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटायला बोलावले होते. त्यानुसार, आज त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. या भेटीत त्यांनी त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी सध्या कोणत्याही पक्षात जाण्याच्या मार्गावर नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंची मी भेट घेतली. आज त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. या समस्यांवर उत्तर मिळालं की मी पुढचा निर्णय लवकरात लवकर घेईन.”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपाकडून ऑफर आल्याचंही म्हटलं जातंय. त्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजूनही मी ठाकरेंबरोबरच आहे. अजूनही मी गद्दारी केलेली नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना मी समस्यांबाबत पत्र दिलं होतं. स्थानिक पातळीवर या समस्या सोडवल्या जातात. पण तसं झालं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे यावं लागलं.”