निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा एक पत्र लिहित पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना दिला आहे. दीपक मानकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये खोटे कागदपत्र सादर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
मानकर यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात अनेक बाबींचा उल्लेख करत आपले म्हणणे मांडले आहे. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडळता येणाऱ्या महापालिका निवडणूक पाहता तसेच माझी राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दीपक मानकर हे अजित पवार यांचे निष्ठावतांपैकी एक मानले जातात.
हेही वाचा – महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश
‘माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु, हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही, असे देखील मानकर म्हणाले आहेत.
आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.’ असे दीपक मानकर यांनी पत्रात नमूद केले आहे.