420 सेवांबाबत नागरिकांना मिळाले मार्गदर्शन

- जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत जनजागृती : व्यावसायिक सेवांचे केंद्रचालकांना धडे
पुणे – आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या “महाऑनलाईन आणि सीएससी’ सेवा बाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाऑनलाईन मार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या 420 सेवा ग्रामस्थांना कशा पध्दतीने उपलब्ध करून द्यायच्या, त्यामध्ये महसूल विभागाकडील जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेयर, रहिवाशी दाखला, शेतकरी असलेला दाखला, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र आणि इतर विभागाकडील सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केले.
केंद्रचालकांनी महाऑनलाईन आणि सीएससी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा तत्काळ ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावे. तसेच भारतनेटअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यशाळेनंतर तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. – संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण भालेराव आणि आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक सागर बोरा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आयोजीत प्रशिक्षण कार्यशाळाते ग्रामपंचायत कार्यालयातील केंद्र चालकांसाठी नव्याने उपलब्ध केलेल्या महाऑनलाईनच्या सेवा नागरिकांना कशा प्रकारे द्यायचा, त्याचा फायदा काय, त्यामुळे नागरिकांचा वेळ कशा वाचेल, या सेवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती कशी करायची याबाबतचे मार्गदर्शन प्रविण भालेराव यांनी केले.
सागर बोरा यांनी शासनाच्या सीएससी डिजीटल सेवा पोर्टलवरून जाणाऱ्या व्यावसायीक सेवाबाबत केंद्रचालकांना मार्गदर्शन केले. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईल यासह अन्य सर्व प्रकारचे रिचार्ज उपलब्ध होणार आहेत. तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड काढणे किंवा बदल करणे, पासपोर्ट काढणे, पीक विमा भरणे, वीज बिल भरणे, बस, रेल्वे आणि विमान तिकिट बुक करणे, बॅंकीग सेवा आणि रक्त तपासणी लॅबची सुविधा यासह इतर अनेक प्रकारच्या व्यावसायीक सेवा यातून दिल्या जात असल्याचे बोरा यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत नारायणकर आणि प्रविण लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.





