कोस्टल रोडच्या सौंदर्यीकरणासाठी ४०० कोटी…

मुंबई : मुंबईचा ‘कोस्टल रोड केवळ वाहतूक सुलभकरण्यापुरता न राहता, शहराच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या प्रकल्पाच्या हरित विकास आणि सौंदर्याकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सादर करण्यात आलेल्या आराखड्याचे परीक्षण आणि मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडून स्वतंत्र ‘लडस्केपिंग कमिटी’ गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती केवळ आराखड्याच्या मंजुरीपुरतीच मर्यादित राहणार नसून, सौंदर्याकरणाशी संबंधित सर्व परवानग्या देण्यासाठी ‘सिंगल विंडो फॅसिलिटेटर’ म्हणून काम करणार आहे.
कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण ७० हेक्टर जागेवर हरित क्षेत्र विकसित करण्याचा पालिकेचा मानस आहे. यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने खासगी कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) मागवल्या होत्या. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. रिलायन्सकडून सादर झालेल्या आराखड्यानुसार, कंपनी ५३ हेक्टर क्षेत्रावर आकर्षक बागा, सायकल आणि पादचारी मार्ग, सार्वजनिक सुविधा, उद्याने, लाइटिंग, सुरक्षा व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणार आहे. या प्रकल्पाची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी रिलायन्स पुढील ३० वर्षे सांभाळणार आहे.
या हरित विकासात पाणी पुनर्वापरासाठी एसटीपी पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत उपाय, ऊर्जा बचतीची व्यवस्था, सीसीटीव्ही निरीक्षण, स्वच्छतागृहे आणि देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रस्तावास अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर लवकरच समितीची घोषणा होणार असून, सौंदर्याकरणाशी संबंधित सर्व परवानग्या आणि देखरेख या एकाच समितीमार्फत हाताळल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोस्टल रोडचे काम दोन टप्प्यांत…
कोस्टल रोडच्या सौंदर्याकरणाचे काम दोन टप्प्यांत विभागले गेले आहे. टाटा सन्स लिमिटेड ही कंपनी सुमारे ५ हेक्टर मध्यवर्ती पट्टा विकसित व सांभाळत आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ५३ हेक्टर खुल्या जागेच्या हरित विकासाचे काम सोपवण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोस्टल रोड परिसर लवकरच हिरवागार, आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनणार असून, मुंबईच्या किनारपट्टीला एक नवे सौंदर्य प्राप्त होणार आहे.




