Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला

कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा

औरंगाबाद – यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये याविषयीची घोषणा केली. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन भरवण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावर्षी होणारे साहित्य संमेलन हे 94 वे असेल. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी साहित्य संमेलन भरवण्यासाठी असमर्थता दर्शवली.

पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचे कळवले असल्याचे ठाले पाटील म्हणाले. त्यामुळेच नाशिकमध्ये यावर्षीचे साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचे आयोजकत्व देण्यात आले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचे नियोजन आहे. संमेलनाच्या नेमक्या तारखा नाशिककरांशी चर्चा करुनच निश्चित केल्या जातील, असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. साहित्य महामंडळाचे संमेलन स्थळ निवड पाहणी समितीने फक्त नाशिकचीच पाहणी काल केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, नाशिक शहराची साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button