पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी
कोलकाता – पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोदींच्या येथील सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे सभेच्याठिकाणी गोंधळ उडाला. तर काहीवेळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मोदींनीही अर्ध्यातूनच आपले भाषण बंद केले. या चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थितीत अनेकजण जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचे चित्र पाहिल्यामुळेच ममता दीदी हिंसेवर उतरल्या होत्या, हे मला आता समजले.
PM Narendra Modi in Thakurnagar: Ye drishya(crowd) dekhne ke baad ab mujhe samajh mein aa raha hai ki didi hinsa pe kyun utar aayi hain #WestBengal pic.twitter.com/82n9xDiUcH
— ANI (@ANI) February 2, 2019
आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेले नाही, हे देशाचे दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी केला आहे. मात्र, मोदींनी आपले भाषण आवरते घ्यावे लागला. गर्दीमुळे सभेच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर, या घटनेत काही महिला आणि लहान मुले जखमी झाल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले.
मोदींची सभा सुरू झाल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन सभा ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी आहे त्या जागेवर बसूनच सभा ऐकण्याचे आवाहन केले होते. विशेषत: महिलांना उद्देशून मोदींनी हे आवाहन केले होते. मात्र, चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येताच मोदींनी भाषणासाठी पुढील ठिकाणी जायचे असल्याचे सांगत आपले भाषण मध्येच बंद केले. सभेला रेकॉर्डब्रेक गर्दींमुळे पोलिसांची,आयोजकांची चांगली तारांबळ उडाली होती.





