पंधरा लाखांची जुमलेबाजी आणि बेरोजगारीला सरकारच जबाबदार – उध्दव ठाकरे

मुंबई – गेल्या साडेचार वर्षामध्ये सत्तेत राहून शिवसेनेने भाजपला धारेवर धरले आहे. बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी अशा अनेक मुद्यांवरून भाजवर शिवसेनेने टिका केली आहे. तरीही, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युतीसाठी हात मिळविला आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर मत व्यक्त केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपाच्या अनेक मतांशी सहमती दर्शवली आहे. मात्र, त्याचवेळी भाजपाच्या काही भूमिकांना स्पष्टपणे विरोध असल्याचेही सांगितले आहे.
काँग्रेसमुक्त भारत झाल्यास या देशातील सगळे प्रश्न संपतील असं आपल्याला वाटतं का?’ असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध असल्याचे उद्धव यांनी सांगितले. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा,’ असं उद्धव यांनी सांगितले. याच संदर्भात बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विरोधीपक्षाबद्दल दिलेला सल्लाही उद्धव यांनी सांगितला. ‘मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते. मुळात विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणे असं नाही. विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते,’ असं एकादा विरोधीपक्षाबद्दल बोलताना शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलं होतं अशी आठवण उद्धव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.
विरोधीपक्ष महत्वाचा असल्याचे सांगतानाच उद्धव यांनी कुणालाही नष्ट करा अशी माझी कधीच भूमिका नसते असं स्पष्ट केलं. ‘काँग्रेस नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त किंवा हे मुक्त, ते मुक्त असल्या फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत. आज काँग्रेसची अवस्था ही निर्णायकी आहे हे नक्की. त्यांच्याकडे आता नेतृत्व म्हणून नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासारख्या उंचीची नेते मंडळी नाहीत,’ असं उद्धव यांनी सांगितलं. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामाची स्तृती उद्धव यांनी केली. ‘मनमोहन सिंगांनीसुद्धा पहिली पाच वर्षं चांगलंच काम केलं पण त्या दर्जाची माणसं आता पक्षात दिसत नाहीत,’ असं उद्धव यावेळी म्हणाले.





