पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाला ‘आयसीएचआर’च्या कार्यालयाची भेट

पुणे : ‘नमामि गंगे’ मोहिमेचा प्रारंभ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाला ‘इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’च्या (आयसीएचआर) कार्यालयाची भेट मिळणार आहे. शिक्षणाचे भगवेकरण आणि इतिहास अभ्यासक्रमांतील बदल या विषयांवरून भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका होत असताना पंतप्रधानांच्या मतदारसंघात हे कार्यालय होणार आहे. भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळलेल्या जम्मू-काश्मीर राज्यातील काश्मीरमध्ये संस्थेची शाखा प्रस्तावित आहे.
इतिहास विषयामध्ये अभ्यास आणि संशोधन करून ग्रंथनिर्मितीचे काम ‘आयसीएचआर’ करत असते. राजधानी दिल्ली येथे संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. त्याखेरीज पुण्यातील डेक्कन कॉलेज, कर्नाटकातील बंगळुरु आणि आसाममधील गुवाहाटी अशा देशभरातील तीन ठिकाणी संस्थेची कार्यालये आहेत. संस्थेच्या कामाचा विस्तार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघासह काश्मीर अशा दोन ठिकाणी नव्याने कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. अरिवद जामखेडकर यांनी दिली. संस्थेच्या नियामक मंडळामध्ये १८ सदस्यांचा समावेश आहे. संस्थेमार्फत इतिहासविषयक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या कामांसाठी वार्षिक २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या माध्यमातून इतिहासविषयक प्रकल्प, पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य़, वरिष्ठ संशोधकांना अनुदान, परदेशामध्ये शोधनिबंधाचे वाचन करण्यासाठी जाणाऱ्या अभ्यासकांना प्रवासखर्च असे उपक्रम राबविले जातात. संस्थेने इतिहास लेखन आणि संशोधन कसे करावे या विषयाची कार्यशाळा बंगळुरु येथे नुकतीच घेतली होती. अभिलेखांमधील पदनाम कोश, महसुलामधील पारिभाषिक शब्दांचा कोश असे प्रकल्प सध्या सुरू आहेत, असे जामखेडकर यांनी सांगितले.
हुतात्म्यांची माहिती देणारा पाचवा खंड पूर्णत्वाकडे
देशाच्या स्वातंत्र्य लढय़ामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लष्करी जवान आणि सामान्य नागरिक अशा सर्वाची छायाचित्रासह संक्षिप्त माहिती देणारी सूची करण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला होता. या प्रकल्पातील चार खंड यापूर्वीच प्रकाशित झाले असून पाचवा खंड पूर्णत्वाकडे आहे. या खंडाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे डॉ. अरिवद जामखेडकर यांनी सांगितले.





