breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘निखळ कविता आषाढघना प्रमाणे आसतात’; म. भा. चव्हाण

पिंपरी : स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे तर्फे आषाढ काव्यधारा कवीसंमेलन नुकतेच चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात पार पडले. यावेळी २१ मान्यवर कवींचा सहभाग असलेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी गझलकार, म.भा. चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून हास्यकवी, विडंबनकार म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल दिक्षित उपस्थित होते.

अध्यक्ष म.भा चव्हाण आपल्या मनोगतातून म्हणाले की, कविता सुचणे कविता लिहिणे कविता सादर करणे हे शास्त्र असते. निखळ कविता या आषाढ घनाप्रमाणे असतात. ज्या आतून भरून येऊन बाहेर पडल्या पाहिजेत. त्याप्रसंगी त्यांनी अनेक कविता गाऊन सादर केल्या. ‘तुझ्याचसाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू, ज्याला काही चोरायाचे त्याने समुद्र चोरावा, नदीकाठचा एकांत उचलावा, छोटा असो किंवा मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा स्वर्गास आग लागो, तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा, अशा अनेक दर्जेदार कवितांमधून म. भा. चव्हाण यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.

त्याप्रसंगी अनिल दिक्षित आपले मनोगत व्यक्त करताना, महाकवी कालिदासाची आणि मेघदूत निर्मितीची आणि त्याच्या पार्श्वभूमीची माहिती सांगितली. ते पुढे म्हणाले की, आषाढ पाऊस म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीची प्रेरणा देणारा ऋतू आहे. त्याचबरोबर, ‘मोहरती जशी आंबराईतली झाडं’, ‘आषाढ हा आभाळाला लागलेला पाड’ आणि ‘पक्ष फोडला फोडला फोडला’ हे विडंबन गीत सादर केले.

हेही वाचा – वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले..

यावेळी शामराव सरकाळे – विठूरायाची वारी, तानाजी एकोंडे – जीव शोधतो किनारा, आत्माराम हारे – पाण्याचा दुष्काळ, प्रदिप तळेकर – तुझ्या मनात घर मीळेल का रहायला, कैलास भैरट – येरे पावसा, अभिजीत काळे – सल, भरत बारी – काश्मिर एक अनुत्तरीत प्रश्न, प्रकाश निर्मळ – पुन्हा एक दगा झाला, प्रदीप गांधलीकर – पावसाचे गाणे, हेमंत जोशी – आषाढाच्या थेंबांसगे आली गझल, शिरीष पत्की – बहर, निलेश शेंबेकर – कोकणातला पाऊस, विवेक कुलकर्णी – आला पाऊस पाऊस, नंदकुमार कांबळे – रंग/ नेत्रदान, राजेंद्र वाघ – भिजू पावसात, अरूण कांबळे – कबीर, विनोद अष्टूळ – रोज सांजेला तू घरट्यात हवा, दत्तात्रय खंडाळे – विडंबन कमळाबाईनं घड्याळ फोडल, चंद्रकांत धस – दुनियेसाठी / दु:खे गझल अशा वेगवेगळ्या आशयाच्या वेगवेगळ्या विषयांच्या कवितांचा आषाढघन बरसला.
यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र घावटे, शोभा जोशी, सुभाष चव्हाण, अशोक गोरे, रघुनाथ पाटील, संतोष गाढवे अशी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रतिभा महाविद्यालयाचे प्राध्यापक, रवींद्र निरगुडे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनास मदत केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे आणि कार्याध्यक्ष दिनेश भोसले यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्षा वर्षा बालगोपाल यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button