breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सभागृह नेत्याची भूमिका भाजपच्या अंगलट; धरणग्रस्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापौरांनी ऐनवेळी जलपूजन टाळले

मावळ – कोणतात्याही गोष्टींचा सारासार विचार न करता प्रतिक्रिया देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते नामदेव ढाके यांच्यामुळे भाजप पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला. मावळातील पवना धरण जलपूजनाचा अधिकार महापौरांचा असल्याची हास्यास्पद भूमिका त्यांनी घेतली. त्यावर पिंपरींच्या महापौरांना मावळतील धरणाच्या जलपूजनाचा अधिकार कोणी दिला? धरणग्रस्तांचे कोणते प्रश्न पालिकेने सोडविले? असा सवाल करत जलपूजनाचे राजकारण करुन धरणाला बदनाम केले जाते. महापौरांच्या जलपूजनला धरणग्रस्तांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्यावर आज (शनिवारी) जलपूजनचा नियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की ओढवली. तर, ढाके यांनी यावर चुप्पी साधली.

मावळातील धरण 100 टक्के भरल्याने दरवर्षीप्रमाणे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 30 ऑगस्ट रोजी धरणग्रस्त नागरिकांसह जलपूजन केले. त्यावर महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. महापौर पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक असताना खासदारांनी मावळातील पवना धरणाचे जलपुजन केल्याने महापौरांचा अवमान झाल्याची हास्यास्पद भूमिका मांडली. ढाके यांच्या विधानाला पवना धरणग्रस्तांनी तीव्र विरोध केला. धरण उभारणीसाठी आम्ही मोलाची जमीन दिली. बंदिस्त जलवाहिनी योजनेमुळे मावळच्या तीन शेतक-यांचा बळी गेला. अनेकांना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या. असे असतानाही महापालिकेने धरण परिसरातील शेतक-यांच्या व्यथा कधी जाणून घेतल्या नाहीत.

पवना धरणावर पालिकेचा काडीमात्र अधिकार नाही. आमच्या समस्या अजूनही तशाच असताना पिंपरीच्या महापौर धरण पुजनाचे नाटक कशासाठी करतात?, त्यांना जलपुजनाचा अधिकार कोणी दिली? नामदेव ढाके यांनी जलपूजनाला यावे. धरणग्रस्तांच्या अडी-अडचणी काय आहेत. हे त्यांना दाखवून देऊ. सत्तेच्या खुर्च्या ऊबवणा-यांनी पिंपरीत बसून तारे तोडू नयेत. अन्यथा जशाच तसे उत्तर द्यावे लागले असा इशार धरणग्रस्तांनी दिला होता. महापौर उषा ढोरे यांचा जलपूजनचा आज (शनिवारी) नियोजित कार्यक्रम होता. महापौर जलपूजनसाठी पवना धरणावर जाणार होत्या. त्यापार्श्वभूमीवर धरणग्रस्त संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौरांसमोर समस्यांचा पाढा वाचण्यासाठी धरणग्रस्त नागरिक सकाळपासून महापौरांची वाट बघत थांबले. पण, याची महापौरांना कुणकुण लागताच त्यांनी दौरा रद्द केल्याचा दावा शिवसैनिक, धरणग्रस्त संघटनांनी केला.

शिवसेना तालुका उपप्रमुख अमित कुंभार म्हणाले, ”पिंपरी-चिंचवडच्या महापौर आज पवना धरणाचे जलपूजन करण्यासाठी येणार होत्या. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 30 ऑगस्ट रोजीच जलपूजन केले. त्यावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वादग्रस्त विधान केले. पवना धरणावर जलपूजनाचा अधिकार फक्त महापौरांचा असल्याचे सांगत खासदारांवर टीका केली. धरण मावळाचे आणि त्यावर पिंपरीच्या महापौरांचा अधिकार कसा राहील. त्यांचा अपमान कसा होईल याचे भान सभागृह नेत्याला राहिले नाही. प्रसिद्धीसाठी त्यांनी टीका केली. त्याचा निषेध करण्यासाठी आणि पवना धरण बद्दल असलेली अस्मिता दाखविण्यासाठी धरणग्रस्तांच्या सर्व संघटना आणि शिवसैनिक एकत्रित थांबलो होतो”.

”सकाळी सात वाजल्यापासून धरणग्रस्त संघटनेचे रवी रसाळ, मुकुंद काळभोर यांच्यासह आम्ही निषेध करण्यासाठी थांबलो होतो. याची कुणकुण लागताच महापौरांनी दौरा रद्द केला. महापौरांनी दौरा रद्द केल्याने सर्वांनी निषेध सभा घेतली. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पालिकेने बाधितांना किती नोक-या दिल्यात हे जाहीर करावे. महापालिकेने धरणातील गाळ काढण्यासाठी किती निधी दिला. धरणग्रस्तांना गाळे किती दिले. या सर्व गोष्टी महापौरांनी जाहीर कराव्यात यासाठी आम्ही थांबलो होतो. परंतु, पिंपरी महापालिकेचे एकही अधिकारी, महापौर कोणीही फिरकले नाही. धरणग्रस्त, शिवसैनिकांच्या दणक्याने महापौरांनी जलपूजन टाळले. खासदार बारणे यांनी सात वर्ष धरणातील गाळ काढला. त्यांच्याबाबत अपशब्द काढले. तर, शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

”वादग्रस्त टिप्पणी कोणी करु नये, धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहे. पवना धरण हे पिंपरी-चिंचवड धरण नाही. त्याच्यावर धरणग्रस्तांचा अधिकार आहे. पिंपरी महापालिकेचा नाही. याचे महापालिकेतील पदाधिका-यांनी भान ठेऊन विधान करावे”, असा सल्ला धरणग्रस्तांनी महापालिकेतील भाजप पदाधिका-यांना दिला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,संघटक अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, तालुका उपप्रमुख अमित कुंभार,आशिष ठोंबरे, चंद्रकांत भोते, मदन शेडगे. समन्वयक रमेश जाधव, महिला संघटिका शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोंटे, विभाग प्रमुख किसन तरस, राम सावंत, उमेश दहीभात , लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, देहू शहर प्रमूख सुनील हगवणे, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, देव खरटमल, सिध्द नलवडे , सतीश इंगवले,युवा अधिकारी श्याम सुतार, तळेगाव महिला आघाडी संघटिका रुपाली आहेर, सुनंदा आवळे, सुरेखा मोरे, माजी सरपंच अनिल भालेराव , शहर शाखा प्रमुख सुरेश गुप्ता,सचिन कलेकर, विकास कलेकर, किशोर शिर्के, अंकुश वागमारे, उमेश ठाकर,पोपट राक्षे, युवराज सुतार, धरणग्रस्तांचे नेते रविकांत रसाळ, मुकुंद कौर, किसन घरडाले, शंकर दळवी, छबन काळे, बाजीराव शिंदे, छाया काळेकर, लिलाबाई डोंगरे, राम काळेकर, सरपंच सुनील येवले, आकाश वाळुंज, ग्रा .प .सदस्य रुपाली इंगवले सर्व शिवसेना महिला आघाडी युवा सेना व भा .वि .से .युवती सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button