breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसंवाद : ‘मशाल’ पेटली ; पण ‘ढाल-तलवारी’चा खणखणाट दिसेना !

पिंपरी-चिंचवडमधील शिंदे गटात शांतता : ठाकरे गटाकडून जल्लोष अन् शक्तीप्रदर्शन

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
शिवसेनेची दोन शकले निर्माण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या समर्थकांनी ‘मशाल पेटवली’, जल्लोष केला. मात्र, शिंदे गटात कमालीची शांतता दिसत आहे. खासदार श्रीरंग बारणे स्वत: शिंदे गटाचे समर्थक असताना शहरात मात्र, ‘ढाल- तलवारी’ चा खणखणाट दिसला नाही.
राज्यातील सत्ता पटलावर प्रचंड उलथापालथ सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘शिवसेना’ पक्षात दोन गट निर्माण झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा संघर्ष पेटला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आणि ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह दिले. दुसरीकडे, ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले. संपूर्ण ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षाचे पडसाद उमटले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पिंपरी-चिंचवडमध्ये मशाल पेटवण्यात आली. त्याद्वारे अगदी वाजत-गाजत नव्या चिन्हाचे स्वागत केले. तसेच, गद्दारांच्या ४० तोंडाच्या रावणाला आमची मशाल जाळून टाकणार…असा गर्जनाही पहायला मिळाली.
दुसऱ्या बाजुला, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाला अर्थात ‘बाळसाहेबांच्या शिवसेने’ला समर्थन दिले आहे. तसेच, पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वारही त्यांच्यासोबत आहेत. विद्यमान खासदार आणि टीम सोबत असतानाही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उत्साह पहायला मिळाला नाही.
**
राहुल कलाटे गटामध्येही शांतता…
शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष व गटनेते राहुल कलाटे यांच्या गटातही कमालीची शांतता दिसत आहे. शहरातील राजकीय परिस्थिती आणि अस्थिरता पाहता कोणत्याही गटाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, असा काहीसा पवित्रा कलाटे यांचा दिसतो आहे. वास्तविक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघांच्यासोबतही कलाटे यांचे निकटते संबंध आहेत. २०१९ मध्ये कलाटे यांनी चिंचवड विधानसभा अपक्ष लढवली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीने त्यांना पाठींबा दिला होता.
संघटनात्मक बांधणीकडे बारणेंचे लक्ष…
शिंदे गटाचे अर्थात ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’चे खासदार श्रीरंग बारणे यांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सध्यस्थितीला युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बारणे यांचे सुपूत्र विश्वजीत बारणे यांच्याकडे युवासेनेचे शहर अधिकारी पद होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे सांगण्यात येते. शिंदे गटाकडून स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर करण्याच्या हालचाली सुरू असून, संघटनात्मक बांधणीसाठी खासदार बारणे स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button