breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ.. धक्क्यावर धक्के, पण अखेर धनंजय महाडिकांनी गुलाल उधळलाच!

कोल्हापूर : गेल्या पाच सहा वर्षात ज्या पराभव या शब्दाने कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाची पाठच धरली होती, त्या पराभवावर मात करत अखेर या गटाने विजयाचा झेंडा रोवला. राज्यसभेतील धनंजय महाडिक यांच्या विजयाने या गटाला मोठी उभारी तर मिळणार आहेच शिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजपळला मोठे बळही मिळणार आहे.

लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा अनेक निवडणुकीत महाडिक गटाला सहा वर्षात सतत पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला धनंजय महाडिक, विधानसभेला अमल महाडिक, विधानपरिषदेला महादेवराव महाडिक, विधानसभेला सत्यजीत कदम यांना पराभवाचा धक्का बसला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत या गटाला माघार घ्यावी लागली. पंचवीस वर्षाची गोकुळ दूध संघातील सत्तेबरोबरच महापालिका, जिल्हा परिषद यावरीलही सत्ता गेली. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी वारू तर दुसरीकडे महाडिक गटाचा पराभव या शब्दाने धरलेला पिच्छा यामुळे महाडिक गटाची ताकद कमी होत होती. यामुळे या गटाला नव्याने उभारी मिळण्यासाठी एक मोठ्या विजयाची गरज होती. राज्यसभेतील विजयाने ही उभारी मिळाली आहे.

धनंजय महाडिक हे राजकारणात आल्यापासून त्यांना सतत संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात मोदी लाटेतही ते लोकसभेला विजयी झाले. त्यांना एकदा विधानसभा तर दोनदा लोकसभेला पराभूत व्हावे लागले. २००९ ला तर हातातोंडाजवळ आलेली राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी ऐनवेळी गेली. यामुळे विजयासाठी सतत संघर्ष करण्याची त्यांची परंपरा राज्यसभेतही कायम राहिली. सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्याने त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. त्यांच्या या विजयाने महाडिक गटाच्या पराभवाची मालिका खंडित झाली आहे. यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणात नव्या संघर्षाला धार येणार आहे. विशेषता पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष अधिक तापण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरूवात राजाराम साखर कारखाना, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत होणार आहे.

महाडिक गटाला उभारी मिळणार!

महाडिक यांच्या विजयाने या गटाला जशी उभारी मिळणार आहे, त्याच प्रमाणे भाजपला मोठे बळ मिळणार आहे. महाडिक यांच्या रूपाने भाजपला जिल्ह्यात पहिला खासदार मिळाला आहे. एकही आमदार निवडून न आल्याने जिल्ह्यात पक्षाची वाताहत झाली होती. आता मात्र थेट खासदारच मिळाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. महाडिक गट जिल्हाभरच नव्हे तर सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यातही आहे. खासदारकीचा वापर करत पक्ष वाढीला नक्कीच मदत होणार आहे.

या विजयाने मिळालेल्या ताकदीच्या जोरावर आता महाडिक गट आगामी काळात आतापर्यंत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात करायलाही वेळ लागणार नाही. कारण दोन तीन महिन्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. महाडिक गटाकडे गेल्या तीन वर्षात एकही पद नव्हते. खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा अशी सर्वच पदे गेल्याने या गटाची मोठी अडचण झाली होती. आता मात्र धनंजय महाडिक खासदार झाल्याने पुन्हा पदे येण्याची सुरूवातच झाली आहे.

कौन है ये मुन्ना?

अठरा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात लढलेल्या धनंजय महाडिक यांचा उल्लेख शरद पवार यांनी कौन है ये मुन्ना? असा केला होता. याच मुन्नाला त्यांना राष्ट्रवादी पक्षात घेतले. याच पक्षाच्या चिन्हावर ते खासदार झाले. पण नंतर २०१९ च्या पराभवाने महाडिक यांनी या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाडिक यांचा पराभव करण्यासाठी थेट शरद पवारांनी राज्यसभेच्या मतांची रणणिती आखली. तरीही महाडिक विजयी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button