breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : विलास लांडे नाटकी माणूस…त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही!

खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी फटकारले : शिरुर मतदार संघात महायुतीमध्ये तणावाचे वातावरण

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे आले नाहीत. विरोधी पक्षात असल्याने त्यांना कामही फारसे करता आले नाही. पण, खेड तालुक्यात त्यांचा फारसा त्रासही झाला नाही. आढळरावांचा मात्र आम्हाला व कार्यकर्त्यांना त्रास झाला. मात्र, कोल्हे यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कार हा त्यांनी संसदेत केलेल्या भाषणांसाठी आहे, कामासाठी नाही. वळसे पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून खेड तालुक्याला भरपूर मदत करता आली असती, पण ती झाली नाही. एकत्र असलो तरी ती खंत आजही आहे. विलास लांडे हा नाटकी माणूस आहे, ते आज एक भूमिका घेतील, उद्या दुसरी घेतील. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात प्रवेश देवून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांचे पारंपरिक विरोधक अस्वस्थ असून, दिलीप मोहिते-पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे या मतदार संघातून इच्छुक होते. त्यांच्याबाबत विचारना केली असता, मोहिते-पाटील यांनी त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लांडे यांच्या बोलण्याला अर्थ नाही, असा दावा मोहिते-पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे खेड विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या तिकीटावर लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे लांडे यांची खेडमधील दौरे आणि कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळे लांडे यांनी आपल्या मतदार संघात केलेला हस्तक्षेप दिलीप मोहिते-पाटील यांना रुचलेला नाही, असे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवडमधील स्व. गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रशासन समारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी विलास लांडे त्या व्यासपीठावर गेले. त्या ठिकाणी शिवसेनेचे संजय राउत यांचा मी फॅन आहे असे म्हणाले. इकडे महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहातात…असा उल्लेख करीत दिलीप मोहिते पाटील यांनी लांडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

‘‘माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांबरोबर मतभेद आहेतच, पण राजकीय तडजोड म्हणून, पक्षासाठी आणि नेत्यांचा आग्रह आहे म्हणून आपण आढळरावांचा प्रचार करणार, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते यांनी दिली. तसेच, त्यांच्या प्रचाराची धुरा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारावी, असे मत आपण व्यक्त केल्याचे मोहिते यांनी सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबई येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्याची चर्चा होती. त्याबाबत मोहिते यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला.

ते म्हणाले, ‘‘मी, अजित पवार, वळसे पाटील, आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, प्रदीप कंद आदी या बैठकीस हजर होते. त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत मते घेण्यात आली. त्यांची उमेदवारी पक्षाला फायदेशीर आहे, असे नेत्यांनी सांगितले. सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले. अजित पवार यांचे नेतृत्व आणि निर्णय मानत असल्याने मी राजकीय तडजोड म्हणून मान्यता दिली. मात्र, प्रचाराची आणि पर्यायाने त्यांना विजयी करण्याची जबाबदारी वळसे पाटील यांनी घ्यावी, असे मत मांडले. गेल्यावेळी पक्षादेश म्हणून आढळरावांच्या पराभवासाठी प्रयत्न केले, या वेळी पक्षासाठी जिवाचे रान करून त्यांचा प्रचार करणार आहे.’’

अजित पवार उद्या खेडमध्ये…

माझा आढळरावांच्या उमेदवारीला विरोध होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, नेत्यांचा आग्रह आणि पक्षाला फायदा म्हणून माझ्या भावभावना व मते मी बाजूला ठेवण्याचे ठरवले. माझ्या कार्यकर्त्यांची मते अजमावीत, असे मी त्यांना सांगितले, म्हणून अजित पवार हे गुरुवारी (ता. २१) राजगुरुनगर येथे येत असून फक्त कार्यकर्त्यांशी ते बोलणार आहेत. त्यांना भूमिका समजावून सांगणार आहेत. वळसे पाटील यांचा आढळरावांच्या उमेदवारीसाठी जास्त आग्रह आहे, म्हणून जबाबदारी त्यांनी घ्यावी, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, असे नेत्यांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या मताला किंमत नाही…

‘‘अनेक वर्षांचे वैमनस्य असल्याने एकदम जुळवून घेणे अवघड असते. शिवाय सगळेच सूर जुळले पाहिजेत, असे आवश्यक नाही. त्यांना त्यांचे विचार आहेत, मला माझे विचार आहेत. पण, आता पक्षांचे सर्व्हे आहेत. त्यामुळे निर्णय नेत्यांचा आहे. नेत्यांना ते निवडून येतील, असा विश्वास असेल तर माझ्या मताला काही किंमत नाही. मात्र, निर्णय त्यांचा असल्याने जबाबदारीही त्यांची आहे. वळसे पाटील आणि आढळराव यांचेही वैमनस्य होते, तरी वळसे पाटलांनी कधी त्यांच्यावर टोकाची भूमिका घेऊन टीका केली नाही. किंबहुना खेड तालुक्यात जसे टोकाचे मतभेद झाले, तसे आंबेगाव तालुक्यात झाले नाहीत. शिवाय ते जुने मित्र होते. त्यामुळे त्यांना जुळवून घेणे सोपे गेले,’’ असे मोहिते यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आढळरावांशी जमवून घेणे, ही फक्त राजकीय तडजोड आहे. अनेकदा त्यांच्याबाबतीत जाहीरपणे मांडलेल्या मतांवर मी ठाम आहे. पुढे सगळे सुरळीत झाले तर ठीक आहे, नाहीतर मी माझा व्यक्तिगत निर्णयही घेऊ शकतो. राजकारणातून थांबूही शकतो. राजकारण केलेच पाहिजे असे काही नाही.
• दिलीप मोहिते, आमदार, खेड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button