breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…”

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. या भेटीवरून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. भाजपा नेत्यांनी केलेल्या विधानांमुळेही भेटीचा सस्पेन्स वाढत आहे. पवार-शाह गुप्त भेटीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. “सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपाचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार-अमित शाह यांच्यातील भेटीच्या वृत्ताची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत आहे. याचा थेट संबंध सरकार बदलण्याशीही लावला जात असतानाच शिवसेनेनं सामना अग्रेलखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

“शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय? पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील? ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरं दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय?,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ”अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.”महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ”मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,” असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळ्यात आधी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी? अशी गुप्त बैठक तर शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालीच होती. त्या गुप्त बैठकीत जे ठरले त्यानुसार न घडल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. जसे महाराष्ट्रात ठाकरे सरकार मजबूत आहे तसे भाजपाचे विरोधी बाकांवरील स्थान बळकट आहे. त्यामुळे कोणत्याही गुप्त बैठका किंवा खलबतांमधून ठाकरे सरकारला सुरुंग लागेल व विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर जाता येईल या भ्रमातून विरोधकांनी बाहेर पडले पाहिजे. पुन्हा भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“शरद पवार यांच्याभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व गुळाची ढेप वितळवून टाकायची, असे भाजपाचे षड्यंत्र असेल, तर ते मूर्खांच्याच नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम गतीनं व नीतीनं चालले आहे. लहान सहान वावटळी येतात आणि जातात. त्या वावटळीने झाडाची पानेही गळत नाहीत. इतके झाडाचे बुंधे आणि मुळे मजबूत आहेत. फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपाचे डावपेच आहेत. पवारांच्याच पुढाकाराने महाराष्ट्रातून भाजपाच्या तोंडचा घास हिरावण्यात आला. महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत भाजपाविरोधी आघाडीस बळ देण्याची शर्थ पवार करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपाचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं,” अशी खोचक टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.

वाचा- अश्लील छायाचित्राच्या आधारे तरुणीवर अत्याचार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button