बूट फेकणाऱ्या वकिलाला माफ का केलं? सरन्यायाधीश भूषण गवईंची स्पष्टोक्ती

Bhushan Gavai | सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तर मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (२३ नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. गवई यांनी निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवशी एका महत्वाच्या प्रकरणावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.
६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या अभूतपूर्व घटनेने देशभरात खळबळ माजली होती आणि संबंधित वकिलावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र गवई यांनी त्या दिवशीच वकिलाला माफ करत कोणतीही तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेवर आता भूषण गवई यांनी त्यांच्या सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिक्रिया देत बूट फेकणाऱ्या वकिलाला आपण माफ का केलं? याचं कारण सांगितलं आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका टाकाऊतून साकारतेय नवनिर्मिती!
भूषण गवई यांनी म्हटलं की, मला वाटलं की त्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे, असं त्यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अनौपचारिक संवादादरम्यान पत्रकारांना सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच गवई यांनी आपण पूर्ण समाधानाने आपला कार्यकाळ पूर्ण करत पद सोडत असल्याचंही सांगितलं. त्याच बरोबर आता निवृत्तीनंतर आपण कोणतंही पद स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.




