“तिजोरी तुमच्याकडे, पण तिचा मालक आमच्याकडे”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना पलटवार

Chandrakant Patil | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असताना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार प्रचारसभांमध्ये वारंवार मतदारांना आवाहन करत आहेत की, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा; तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, माझ्या हातात निधी आहे. यावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
अजित पवारांपाठोपाठ त्यांच्या पक्षातील नेते व पदाधिकारी प्रचारादरम्यान मतदारांना सातत्याने सांगत आहेत की “अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास मोठ्या प्रमाणात निधी मिळेल.” यावर भाजपाने राष्ट्रवादीला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : बूट फेकणाऱ्या वकिलाला माफ का केलं? सरन्यायाधीश भूषण गवईंची स्पष्टोक्ती
चंद्रकांत पाटील म्हणाले, तिजोरीची किल्ली अजित पवारांकडे असली तरी मुख्यमंत्री आमचे असल्यामुळे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. तिजोरी तुमच्याकडे असली तरी मालक आमच्याकडे आहे. विरोधक म्हणतील की त्यांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. पण मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही. परवानगीशिवाय ती उघडली तर त्याला काय म्हणतात ते तुम्हाला माहितीच आहे. कोल्हापुरात विरोधकांकडे एक मंत्री असले तरी आम्ही इकडे दोन मंत्री आहोत.
अजित पवार धाराशिवमध्ये मतदारांना म्हणाले होते, बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढा. अजिबात काही विचार करू नका. तुम्ही मला सर्व १८ उमेदवार निवडून दिले तर तुम्हाला सांगितलेलं सगळं तयार आहे (तुम्हाला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली जातील). तुम्ही माझ्या उमेदवारावर फुली मारली तर मी पण फुली मारणार. मत देणं हे तुमच्या हातात आहे. निधी देणं माझ्या हातात आहे. बाकी बघा तुम्ही.




