‘रशिया असो वा युक्रेन, इस्रायल असो वा इराण, आमचा सर्वांशी संवाद’ ; भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय म्हणाले एस जयशंकर?, वाचा

S Jaishankar : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका कार्यक्रमात भारत आणि जगातील इतर देशांच्या संबंधाविषयी सविस्तर भाष्य केले. तसेच जगात सुरु असणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धावर देखील त्यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली. याविषयी बोलताना “भारत हा अशा काही देशांपैकी एक आहे जो संघर्षग्रस्त जगातील दोन्ही बाजूंशी बोलू शकतो.” असे म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षात भारताच्या भूमिकेचे उदाहरण दिले.
एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर यांनी, ‘सध्या वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या जगात, भारत हा अशा काही देशांपैकी एक आहे जो सर्वांशी संपर्क साधू शकतो, मग ते रशिया असो वा युक्रेन, इस्रायल असो वा इराण, क्वाड असो वा ब्रिक्स. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र परराष्ट्र धोरणालाही तितकेच लागू पडते.” असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा – ‘दंगलखोरांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना त्यांनी, पाश्चात्य देशांप्रमाणे, भारताने युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी रशिया आणि युक्रेनलाही भेट देऊन गेले होते. त्याचप्रमाणे, इस्रायल आणि इराणमधील मतभेदांमध्ये भारत तटस्थ राहिला आहे. भारताने दोन्ही देशांसोबतच्या धोरणात्मक संबंधांमध्ये संतुलन राखले आहे. भारताच्या संरक्षण तंत्रज्ञान आणि उपकरणांसाठी इस्रायल हा एक प्रमुख स्रोत आहे, तर कच्च्या तेलासाठी तो इराणवर अवलंबून आहे. जगभरातील कोणत्याही संघर्षात, दोन्ही पक्षांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्याचा भारताचा प्रयत्न राहिला आहे.
त्यासोबतच एस जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक नेत्यांशी असलेले संबंध अनेक गोष्टी स्पष्ट करतात. जगभरातील राजकीय बदलांबद्दल भारताचा दृष्टिकोन देखील या अंतर्गत दिशा घेतो. जयशंकर म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध, त्याची कारणे आणि त्याचा व्यापक संदर्भ भारताने अतिशय स्पष्टपणे पाहिला आणि इतर अनेक देश या मुद्द्याने भावनिकदृष्ट्या वाहून गेले असतानाही त्यांनी आपली भूमिका निश्चित केली.