ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

वाघ्याच्या समाधीवरून भुंकणे सुरू, औरंग्याच्या कबरीवरून थुंकणे सुरू !

महाराष्ट्रामधील विरोधी पक्षांना सध्या काही कामच राहिलेले नाही. सत्ताधारी ‘महायुती’ ला प्रचंड बहुमत मिळाले असल्यामुळे आता पाच वर्षे काय करायचे? हा प्रश्न विरोधी आघाडीच्या सदस्यांना पडला आहे.

छे..! पाच वर्षे विरोधी बाकांवर ?

राज्यात ‘महायुती’ ला एवढे बहुमत मिळाले आहे, की पाच वर्षे चुकून सुद्धा त्यांची सत्ता डळमळीत होणार नाही. यावर अनेक कार्यकर्त्यांनी उपाय शोधला तो म्हणजे एक तर महायुती मधील एका पक्षात प्रवेश करून टाका, किंवा त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर वेळोवेळी विरोध करा ! यामधूनच पुढे आली ती औरंग्याची कबर आणि रायगड वरील वाघ्या कुत्र्याची समाधी.. हे दोन्ही मुद्दे सुद्धा राजकारणात आता न चालणारे आहेत..पण, त्याशिवाय विरोधकांच्या हातात काहीही उरलेले नाही!

समस्या किती ? वाद कशावर ?

एकूणच राजकारणाची स्थिती पाहिली तर त्यांना एखादा ‘वाद’ चघळायला दिला, की त्यावरच त्यांचे पोट भरते. एवढेच नव्हे तर, त्यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमाचेही पोट भरते. ‘इडियट बॉक्स’ वरील चॅनेलवाल्यांना दिवसभर काय दाखवावे? याची भ्रांत उरत नाही. महाराष्ट्रात रोज नवे वाद निर्माण होत आहेत, केले जात आहेत. त्यातच राजकीय नेते समाधानी आहेत, ही खरी गमतीशीर बाब आहे

औरंग्या, कामरा आणि आता वाघ्या..

सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या कुणाल कामराचा वाद पेटला आहे. त्याआधी औरंगजेबाची कबर गाजली. गेले दोन-तीन दिवस वाघ्या श्वानाचे स्मारक म्हणजेच समाधी गाजत आहे. मूळ प्रश्नांना बगल देऊन हे नवीन काय चालले आहे, आणि ही वादावादी नेमकी कशासाठी हेच समजेनासे झाले आहे.

जनतेचे गंभीर प्रश्न गेले खड्ड्यात..

विविध वादांच्या गदारोळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक गंभीर प्रश्न खड्ड्यात फेकले गेले आहेत. हे सारे पाहिल्यानंतर महाराष्ट्र ही वादांची जननी आहे काय, असा प्रश्न पडतो. एक वाद धुमसत असतानाच दुसरा वादही हळूच डोके वर काढतो. कुणाल कामरा वादाचे कवित्व सुरू असतानाच ‘वाघ्या’ श्वानाचा वाद पेटला असून, या वादात उडी घेणारे एकमेकावर भुंकत आहेत. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत काही दिवसांपासून वाद धुमसत आहे, हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा –  ‘.. तरच भावी पिढी सुदृढ, निरोगी होईल’; ले. कर्नल विनीत नारायण

रायगडवरील वाघ्याचे स्मारक हटवा…

रायगडवरील वाघ्याचे स्मारक काढून टाकावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या मागणीला धनगर समाज व विरोधी पक्षांनी विरोध केला. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या स्मारकाबाबत पुरावा नसल्याची कागदपत्रे दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडली आणि हे स्मारक हटवावे अशी पुन्हा मागणी केली. संभाजीराजे म्हणाले, पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितले आहे की, वाघ्या श्वानाच्या स्मारकाची सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. ‘राजसंन्यास’ नाटकातून वाघ्या श्वानाची दंतकथा निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या श्वानाची समाधी आहे. या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे. याआधीही अनेकवेळा वाघ्या श्वानाच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. आता छत्रपती घराण्याचे १४ वे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

वाघ्याचे स्मारक : पुरातत्व खात्याकडे लक्ष..

संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्याचे स्मारक हटवण्यात यावे,अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि संपूर्ण धनगर समाजाने विरोध केला आहे. वाघ्याचे स्मारक १९३६ ला पूर्ण झाले. २०३६ पर्यंत हे स्मारक काढले नाही, तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत होईल, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे.

राज्यसंन्यास’ नाटकांमधून दंतकथा पसरवली..

वाघ्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता, तेव्हा वाघ्याने त्यात उडी घेतल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. वाघ्याचे स्मारक का उभे राहिले, यावर अनेक वाद आहेत. महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने वाघ्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत, असे म्हटलेले नाही. ‘राजसंन्यास’ नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. याच नाटकाने वाघ्याची दंतकथा निर्माण केली आणि त्याचे स्मारक बांधण्यात आले, असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे. दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचे नाव तिथे जोडले जात आहे. त्यांनी या स्मारकासाठी मदत केली असे म्हटले जात आहे. मल्हारराव होळकर, यशवंत होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान दिले. अशावेळी तुकोजीराव महाराज वाघ्याच्या (श्वानाच्या) समाधीला मदत कशी करतील, असा सवाल संभाजीराजेंनी केला.

आत्ताच वाद का उफाळून आले..

पुरोगामी महाराष्ट्रात अलिकडे मुद्दामहून काही वाद उकरून काढले जात आहेत. औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. या कबरीला चारशेहून अधिक वर्षे झाली आहेत. या चारशे वर्षांत या कबरीला हटवण्याचे प्रयत्न कुणीही केले नाहीत. इतकेच काय पण छत्रपती संभाजीराजे यांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरही एकाही मराठा, सरदाराने अथवा त्यानंतर पेशव्यांनाही ही कबर हटवावी, असे वाटले नाही. मग आजच ही कबर हटवावी असे का वाटते? याचे गौडबंगाल कायम आहे !

संभाजीराव भिडे यांची वादात उडी…

वाघ्याच्या या मुद्द्यावर संभाजीराव भिडे यांनी उडी घेतली असून वाघ्या म्हणजे अनेकांच्या भावनात्मक मुद्द्यांचा गुंता आहे, त्यामुळे ती हटवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. खरे तर पुरोगामी महाराष्ट्राने आपसातील वाद शांततेने सोडवण्याची खरी गरज आहे. महाराष्ट्र अशांत राहिला, तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतात. म्हणून कोणतेही वादग्रस्त प्रश्न असले तरी ते शांततेच्या मागनिच सोडवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही. वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत एखादी दंतकथा असेल तर बिघडले कुठे? त्याच्या इमानदारीबद्दल तर शंका घेण्यास जागा नाही ना ! श्वानाची इमानदारी आपण आजही अनुभवतो आहोतच. मग एखादी दंतकथा दंतकथाच राहू द्या ना..चल रं वाघ्या रडू नको..पाया कुणाच्या पडू नको..दुनिया सारी कधी उलटली, न मला कधी सोडू नको ! असे अभिनेते दादा कोंडके पूर्वी सांगून गेले आहेत.

विकास प्रक्रियेतील स्पीड ब्रेकर!

खरोखर विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसासाठी अशा प्रकारचे वाद हे विकासामधील ‘स्पीड ब्रेकर’ आहेत. कोणालाही वाद नको आहेत फक्त विकास हवा आहे, त्यासाठीच महायुतीला भरभरून कौल मिळाला आहे, हे निश्चित !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button