ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

टवाळखोर, वाचाळवीरांच्या मुसक्या योग्य वेळी आवळा !

आपल्या महाराष्ट्रात सध्या टवाळखोरांचं, वाचाळवीरांचं अमाप पीक उगवलंय. ही पैदास वेळीच ठेचली गेली नाही, तर राज्यात अराजक माजेल, अशी अवस्था आहे.. या वाचाळ वीरांच्या मुसक्या वेळीच आवळायला हव्यात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना एवढीच एक मनापासून विनंती आहे, की यांच्या नांग्यावेळीच ठेचा, नाहीतर पूर्वीच्या सरकारांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही, हे जनतेच्या लक्षात येईल !

हे बघा ना, हल्ली कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि महापुरुषांबाबत अर्वाच्य बोलतो, महापुरुषांचा अवमान करतो, अपमान करतो..आणि मग आहेच.. बिळात बसलेले नागोबा बाहेर पडतात आणि सरकारला धारेवर धरतात, मुख्यमंत्र्यांची जात काढतात..उघडपणे भिडण्याची कुणाचीही लायकी नसते, पण भाषा पंडित असल्यामुळं त्यांची चलती असते आणि मीडियाला तेच हवं असतं, हे नक्की !

टार्गेट : वन अँड ओन्ली मुख्यमंत्री !

आपल्या विधानामुळं काहूर माजेल, याची त्यांना तमा नसते. किंबहुना, रणकंदन माजावे, अशीच त्याची इच्छा असते. मग, तो राहुल सोलापूरकर असो, प्रशांत कोरटकर असो,जितेंद्र आव्हाड असो, ओवैसी असो नाहीतर अबू आझमी! या सगळ्या वाचाळवीरांचे राजकीय पक्ष वेगळे आहेत पण टार्गेट एकच आहे.. मुख्यमंत्री!

या विषवल्ली ठेचा होss..

या साऱ्या विषवल्ली आहेत, त्यांना वेळीच ठेचायला हवं एवढाच सल्ला आपण देऊ शकतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे वंदनीय आणि आदरणीय आहेतच. पण, कोणी तरी येतो आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बरळून जातो, ही आजकालची ‘फॅशन’ बनली आहे. त्यामुळं, विनाकारण समाजात दुहीची आणि द्वेषाची बीज पेरली जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा –  उष्माघाताच्या धोक्यात वाढ! राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना सुरु

या नतद्रष्टांनादंगली हव्यात का?

महापुरुषांची विटंबना असो अथवा त्यांच्याबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं असोत, त्यामुळं राज्यातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या दंगलीसुद्धा झाल्या आहेत. त्यामुळं सामाजिक वातावरण बिघडण्यास मदतच झाली आहे. या टवाळखोरांना तीच परिस्थिती पुन्हा आणायची आहे का? काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी जी काही विधानं केली, ती करण्याची वेळही नव्हती आणि काहीच गरज नव्हती. पण, बोलण्याच्या भरात ते भरकटत गेले आणि आपण महापुरुषांचा अपमान करत आहोत, याचे त्यांना भानच राहिलं नाही.

महापुरुषांना जातीजातीत विभागलं

मुळात गेल्या काही वर्षांत सर्वच महापुरुष आपापल्या जातीमध्ये दुर्दैवानं विभागले गेले आहेत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. काही दिवसांपूर्वी अशा वाचाळवीरांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी सामील झाले. त्यांनी मुघल बादशहा औरंगजेब हा सर्वोत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याच्या कारकीर्दीमध्ये सारे काही ‘आलबेल’ होते, त्याने अनेक मंदिरे उभारली, अशा प्रकारचं विधान केलं. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे. आझमीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता, त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले, हे अवघ्या जगानं पाहिलं. त्यानंतर अबू आझमीचं विधान सभेतून निलंबन झालं.

महापुरुषांचा त्याचप्रमाणं छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना शंभर टक्के गजाआड टाकू, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, की महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामीन मिळवला आहे, पण त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.

कोरटकर चिल्लर, कारवाई कधी?

कोरटकर वगैरे चिल्लर माणसं आहेत, जितेंद्र आव्हाड काय बोलले, त्याचा विरोधकांनी निषेध केला नाही. औरंगजेब होता, म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटांचे होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, हे लक्षात घ्यायला हवं.

आक्रमक मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज..

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ मधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला.त्यावर विरोधक गप्प बसले.

आझमी यांचं धक्कादायक वक्तव्य!

सध्या ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो आदरभाव वृद्धिंगत झाला आहे, त्याला धक्का देणारे वक्तव्य अबू आझमींनी केलं आहे. संभाजी राजांवर अत्यंत क्रूर पद्धतीनं अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचे कोडकौतुक करणारे नेते महाराष्ट्रात आहेत, ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे.

या आधीसुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते ओवैसी यांनी भर सभेमध्ये औरंगजेबाचं अशाच प्रकारे गुणगान केलं होतं. ज्या महापुरुषांबद्दल साऱ्यांच्या मनात आदरभाव आहे, त्यांना गंभीर दुखापत करणारे औरंगजेबासारखे क्रूर बादशहा आदर्श कसे असू शकतात ? महापुरुषांबाचत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्याची तयारी सरकारनं ठेवली पाहिजे.

एक भंपक बोलतो, फटका दुसऱ्याला..

कोणीतरी एकानं केलेल्या चुकीच्या विधानाचा फटका संपूर्ण समाजाला बसण्याचा धोकाही लक्षात घ्यायला हवा, असे विषय पेटणार नाहीत, याचीही काळजी ध्यायला हवी. अशा वाचाळवीरांवर कडक कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे.

चांगला प्रशासक होण्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात. पण, क्रूर कामे करणारा कधीच चांगला प्रशासक होऊ शकत नाही. अबू आझमीना चांगल्या प्रशासकाबद्दलचे आपले मत बदलावे लागेल, प्रसंगी, बडगा उगारून ते समजावून सांगावं लागेल !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button