पुणे महानगर प्राधिकरणातून ही २३ गावे वगळली…

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातून (पीएमआरडी) २३ गावे वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या गावातील हजारो नागरिकांना सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे जिह्यातील पुणे आणि पिंपरी- चिंचवड या महापालिका क्षेत्राचा वाढता विस्तार आणि त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यावर स्थानिक प्रशासनावर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने या दोन्ही महापालिकांच्या परिसरातील वाढते नागरिकरण लक्षात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची(पीएमआरडी) मार्च २०१५ मध्ये स्थापना केली. त्यानंतर महापालिकांच्या हट्टीला लागून असलेल्या गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
तर काही गावांमध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीए तर रस्ते, मलनिस्सारण सारख्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेवर सोपवण्यात आली होती. त्यामुळे प्राधिकरणातील २३ गावांसाठी महापालिका आणि पीएमआरडीए काम करीत असल्याने दोन्ही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकून मोकळ्या होत. तर दुसरीकडे गावकऱ्यांना मात्र पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असे. त्यामुळे आपल्या गावांचा पुणे महापालिकेतच समावेश करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.
हेही वाचा – ‘मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
त्याची दखल घेत पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही सुविधा देतो आणि पीएमआरडी कर गोळा करते अशी भूमिका घेत ही गावे महापालिकेतच देण्याची मागणी पुणे महापालिकेने केली. याबाबतचा प्रस्तावही पालिकेने राज्य सरकारकडे पाठवविला होता.
त्यावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबंधितांची बैठक घेतली, त्यावेळीही या गावांमध्ये नियोजन प्राधिकरणाचे अधिकार देण्याची मागणी पुणे महापालिकेने तर पीएमआरडीएतून वगळण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. त्याची दखल घेत ही २३ गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातून वगळण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला असून त्याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे.
ही गावे पीएमआरडीएतून वगळण्यात येणार आहेत. म्हाळुंगे, सूस, बावधन, किरकीटवाडी, पिसोली, कोंढवे- धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी, नन्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी,सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांबूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.




