पारंपारिक टिकाऊ, इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी
आकर्षक विविध रंगी आकाशकंदीलांनी संपूर्ण बाजारपेठ सजली
नाशिक : आकर्षक विविध रंगी आकाशकंदीलांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. नावीन्यपूर्ण आकार, प्रकार आणि डिझाईनमध्ये आकाशकंदील विक्रीस दाखल झाले आहे. पारंपारिक टिकाऊ, इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी होत आहे. दसरा होताच नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. टिकाऊ आणि इको- फ्रेंडली आकाशकंदीलला अधिक मागणी आहे. विविध आकार, प्रकार आणि नक्षीकाम केलेले ३ इंचापासून ते ६ फुटापर्यंत आकाशकंदील बाजारात विक्रीस आले आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही नागरिकांचा खरेदीकडे अधिक कल दिसून येत आहे. जागोजागी दुकाने सजले आहे. इतकेच नाही तर अन्य जिल्ह्यांसह राज्यात शहरातून आकाशकंदील निर्यात होत आहे. त्यामुळे सध्या शहर आकाशकंदीलचे माहेरघर ठरत आहे. ५० रुपये डझनपासून ५ हजारांत एक असे आकाशकंदील विक्री होत आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने आकाश कंदिलाच्या किमतींमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे.
षटकोनी, डायमंड, स्टार हिंदी, चौकोन, खणाचे कंदील, जाणता राजा, स्वामी समर्थ, फोटो फ्रेम तसेच वॉटरप्रूफ आणि मॅजिक स्टार अशा विविध प्रकारात आकाश कंदील विक्रीस आले आहे. पीयूसी शीटमधील मोल्डिंग आकाश कंदीलचा प्रकार प्रथमच बाजारात दाखल झाले आहे. खणाची साडी, वेलवेट कापड, रंगबिरंगी साधे आकर्षक कापड, बांबू कामटी, पुट्टा, ज्यूट, ओली पेपर,लेस रेशमी दोरी, कार्डशीट पेपर, पीयूसी शीटचा बनविण्यासाठी वापर होतो.
आधुनिकतेचा साज
आकाशकंदीलाची वाहतूक करताना कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. त्यांचा पुनर्वापर करता यावा. यासाठी यंदा पीयूसी सीटमध्ये विविध रंगी आकाराचे आकाशकंदील प्रथमच विक्रीस आले आहे. व्यावसायिक आणि नागरिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची बांधणी कशी करायची. याची यु- ट्यूब लिंक तयार करण्यात आली आहे. आकाशकंदील खरेदी करणाऱ्यांना ती लिंक पाठविली जाते. ती उघडताच व्हिडिओच्या माध्यमातून आकाशकंदीलची बांधणी करणे सोपे होते.
“आकाशकंदीलाची यंदाची बाजारपेठ चांगली आहे. इको- फ्रेंडली कंदीलांना अधिक मागणी आहे. यंदा दरात १० टक्के वाढ झाली आहे.”- प्रशांत कदम, विक्रेता





