Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जून महिन्यात ‘हे’ दोन दिवस विठ्ठलाचं दर्शन राहणार बंद; भाविकांना पंढरपूरला न येण्याचं आवाहन

Pandharpur : लाखो वारकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ आणि २४ जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) मार्गदर्शनाखाली विशेष संवर्धन आणि संरक्षक लेपन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. मूर्तीच्या संवर्धनासाठी पारंपरिक की रासायनिक पद्धत वापरावी, यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार २२ ते २४ जूनदरम्यान रासायनिक पद्धतीने संरक्षक लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा –  ‘नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही’; मंत्री चंद्रकांत पाटील

माहितीनुसार, श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाजवळ झीज होऊन खड्ड्यासारखा भाग निर्माण झाला असून इतर काही भागांमध्येही झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी मूळ दगडाशी सुसंगत दगडी पावडर आणि विशेष सेंद्रिय रसायनांच्या साहाय्याने झिजलेल्या भागांची सूक्ष्म दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे, यासाठी विशेष संरक्षक आवरणही दिले जाणार आहे.

संवर्धनाचे काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी २३ व २४ जून रोजी मंदिरात कोणत्याही प्रकारचे सर्वसामान्य दर्शन उपलब्ध असणार नाही. संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या चार टप्प्यांत संवर्धन करण्यात आले होते. जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मूर्तीच्या संरक्षणासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून भावी पिढ्यांसाठी मूर्तीचे जतन करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

आषाढी वारीसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार असल्याने संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे २३ व २४ जून रोजी दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button