‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने उचलून धरले आहे. या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांच्याकडून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, की संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करत आहेत, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील, असं वाटलं होतं. मला तेव्हा लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसतंय.
हेही वाचा : ‘पीसीसीओई’च्या टीम क्रॅटोस रेसिंगचा फॉर्म्युला भारत-2025 मध्ये विक्रम!
मला वाईट वाटतंय. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. लहान मुले धसांच्या मागे न्यायासाठी धावत होते. जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल तर राज्याची जनता लक्षात ठेवेल. हे पाप आहे, त्याला क्षमा नाही. धसांनी असं केलं असेल तर विश्वासाघातापेक्षाही पुढचं पाऊल आहे, असं संजय राऊत म्हणाले.
बीडचे लोक वारंवार सांगत होते की सुरेश धस, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. नाण्याला दोन बाजू असतात. पण इथे तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही. तरी मला अपेक्षा आहे की धसांकडून असं कृत्य होणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.