सरकारचे शिष्टमंडळ भेटीला, पुढची भूमिका काय? मनोज जरांगे पाटील म्हणाले..

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. २६ जानेवारीला सर्व आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू असून त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे पाटील आज सकाळी लोणावळ्यामध्ये पोहोचले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारकडून दोन शिष्टमंडळं आपल्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचा उल्लेख केला. शिष्टमंडळ चर्चेसाठी आलं आहे. पण मी पहाटे सव्वासातला आलोय. त्यामुळे उठायला उशीर झालाय. आधी लोकांशी चर्चा करून नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करेन, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा – ‘लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार’; भाजप मुख्यमंत्र्यांचा इशारा
एक नवं आणि एक जुनं अशी दोन शिष्टमंडळं आहेत. चर्चा करतो. आमच्या समाजाचं जर त्यात हित असलं, आम्ही म्हणालो तशा मागण्या मान्य असल्या तर बघू, नसल्या तर चलो मु्ंबई. जर-तरला काही अर्थ नाही. सरकारची भूमिका समजल्याखेरीज काही सांगता येणार नाही. २६ तारखेला मराठा समाज मुंबईला येणार हे मी आधीच सांगितलं होतं. आम्हाला मागण्या महत्त्वाच्या आहेत. आरक्षण मिळालं तर आम्ही परत जाणारच. मुंबईत काय घर करून राहणार का आम्ही? असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आपल्या रॅलीत कुणी जाळपोळ किंवा दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडायचं, पळवून लावायचं नाही. त्याला बोटही लावायचं नाही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून हे काम करायचंच आहे. तुम्हाला कुणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, त्याला माझ्यापर्यंत आणा मग मी तुम्हाला दाखवतो. मला विचारल्याशिवाय कुणी कुठलीही कृती करु नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





