श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने
भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा

भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल ? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा; दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले, परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून, त्यांची उत्तरेही सांगून ठेवली; पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला, आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले, तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा त्या वेळी चुकीने काही भलतेच मागू नका, एवढ्याचकरिता हा इशारा आहे.
कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्यावाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो. परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरूण घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भिते; पण पांघरूणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही.
हेही वाचा – राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रस्थानी
त्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी. म्हणजे त्याला भीती वा दु:ख वाटणार नाही, तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही. याकरिता सदासर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदु:ख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दु:ख मानू या.
कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय. आपला म्हणजे ‘मी’ पणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश, बरोबर होतो. “भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दु:खाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दु:खामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दु:खामध्येच ठेव.” असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा.
बोधवचन:- भगवंताला अशी प्रार्थना करावी की, “ देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत; पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस.