अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे.

ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की, कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग, खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरूर आहे. नंतर, प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली, तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील; पण मन दुखविण्याइतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे; कारण, भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांत ‘मी मन आहे’ असे सांगितले आहे.

हेही वाचा-  निमगाव भोगीत प्रदूषणाचा विळखा: ग्रामस्थांची शरद पवार, उदय सामंत यांच्याकडे न्यायाची मागणी

सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असे म्हणाला की, मी एक सत्य तेवढेच जाणतो, आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरू वगैरे कुणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावे ? एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील, तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे ? चोरी करण्याकरिता आालेल्या चोराला, त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का ? सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा, एका बापाला चार मुलगे आहेत; त्या चारांपैकी एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते, आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुचिवैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले, तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल, तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम; आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता, ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत, त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम; म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून, आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे, या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले, तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

बोधवचन:- साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button