चंदन चोरांकडून शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांची निवासस्थाने लक्ष्य
कार्यालयाच्या आवारातील चंदनाची झाडे चोरी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक : चंदन चोरांकडून सध्या शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांची निवासस्थाने लक्ष्य केली जात आहेत. एका पाठोपाठ एक शासकीय कार्यालयाच्या आवारातील चंदनाची झाडे चोरीमुळे तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाच्या व संवेदनशील शासकीय कार्यालयांच्या आवारातच चंदनाच्या झाडांची चोरी होत असेल तर जंगलामधील अगणित झाडांची काय अवस्था असेल, याचा विचारच न केलेला बरा.
त्र्यंबक रोडवर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या बंगल्यामध्ये १२ सप्टेंबरच्या मध्यरात्री सुरक्षारक्षकाचे हात-पाय बांधून चंदनाची झाडे चोरी झाली. तसेच २५ सप्टेंबरला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे जिथे बंदूकधारी रक्षक २४ तास तैनात असतात अगदी त्यांच्यासमोरील झाड कापले. कापलेले झाड चोरटे आहे त्या अवस्थेत सोडून पळाले खरे मात्र तरीही रक्षकांच्या लक्षात आले नाही.
कायमच प्रवेश निषिद्ध असणाऱ्या व वारंवार नियम, गोपनीयता अशी कारणे पावला-पावलावर देणाऱ्या कारागृह प्रशासनाची यामुळे चांगलीच नामुष्की झाली आहे. पोलिस अधीनक्षक बंगल्याच्या आवारातही अशीच घटना घडली होती.नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सीबीएस, त्रंबक रोड या परिसरात महसूल, न्यायालय पोलिस मुख्यालय जिल्हा रुग्णालय, आरोग्य, जलसंपदा सार्वजनिक बांधकाम मनपा अशा प्रमुख विभागातील कार्यालयांबरोबरच संबंधित अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने सुद्धा आहेत.
निवडक दोन-तीन अधिकाऱ्यांचे निवासस्थाने वगळता इतर कुठल्याही ठिकाणी सुरक्षिततेची उपाययोजना प्रशासनामार्फत केलेली नाही. या सर्व ठिकाणी आवारामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. यामधील काही झाडे चंदनाची असून बहुतेक झाडांची वाढ ही बऱ्यापैकी झालेली आहे, त्यामुळे चंदन चोरांचे त्यांवर विशेष लक्ष असल्याचे दिसते.
शॉर्टकटमधून जास्त पैसे
चंदनाच्या लाकडाची मोठ्या किमतीत खरेदी बाजारात केली जाते. त्यामुळे यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. चंदनाचे लाकूड वन विभागातून शासकीय परवाना अंतर्गतच विकत घ्यावे लागते. त्यासाठी वन विभागाचे नियम, अटी, शर्ती आहेत. तसेच शासकीय दराने चंदनाचे लाकूड हे साठवणूक करण्यासाठी वनविभागाचा डेपो परवाना आवश्यक तर आहेच शिवाय त्याचे दरवर्षी नूतनीकरणही आवश्यक आहे. इतक्या कार्यालयीन प्रक्रिया पार पाडण्यापेक्षा सरळ झाडं चोरून जर विकले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. म्हणूनच चंदन चोरांकडून सद्यस्थितीला शासकीय आवारातील झाडे लक्ष्य होत असल्याचे बोलले जात आहे.