अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी
अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण, मंदिर परिसरात कडक सुरक्षायंत्रणा
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी असेल. परिसरातील दुकानदारांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकांनाही ओळखपत्र व गणवेश सक्तीचा असून, मंदिरातील सर्वच घटकांनी भाविकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना आज देण्यात आल्या.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांची समितीने बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सहायक सचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मंदिर परिसरातील दुकानात पेठे व प्रसादाचे साहित्य भेसळमुक्त असायला हवे. आपापले विद्युत जोडणी प्रमाणपत्र घ्यावे. दुकानातील कामगारांसाठीही ओळखपत्रे द्यावीत. कामगारांच्या नावाची यादी देवस्थान समितीकडे जमा करावी. प्रत्येक दुकानातील अग्निरोधक यंत्रणा सुसज्ज असायला हवी, आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.
अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण; मंदिर परिसरात कडक सुरक्षायंत्रणा
दरम्यान, मंदिरातील स्वच्छता व इतर कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणी वेगाने सुरू असून घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा, जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील दर्शन मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. दर्शनरांगेत भाविकांना विविध पिण्याच्या पाण्यासह देवीच्या लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध असेल. मंदिर परिसरात आपत्कालीन कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष आणि माहिती कक्षही भाविकांच्या सेवेत असेल.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कॉंग्रेसच्या वतीने मंदिर परिसराची स्वच्छता झाली. शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, महिला अध्यक्ष रेखा आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली.
पावसामुळे तारांबळ
दिवसभर उसंत दिलेल्या पावसाने शहरात रात्री आठनंतर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेली कामे थांबवावी लागली. परिसरातील विक्रेत्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरील वीज जोडण्या काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
उत्सव काळात अंबाबाई मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. येथे आपली कला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांबरोबरच देशभरातून विविध कलाकार, वादक व संस्था आग्रही असतात. सर्वांच्या सोयीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे काम सुरू असून हे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.