TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

Statement: संकटात आहे सैफ, मुंबई आहे ‘सेफ’ !

आज चार पाच दिवस उलटले.. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी घुसून एका चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. केवळ सुदैवाने सैफ अली खान बचावला. या हल्लेखोराचा उद्देश, तो अशा सुशिक्षित, श्रीमंतांच्या वस्तीत सुरक्षा रक्षकांचे कडे असलेल्या घरात शिरला कसा, त्याला कोणी मदत केली का, चोरीसाठी आला असेल तर त्याने सैफकडे काम करणाऱ्या महिलेकडे एक कोटी का मागितले, वगैरे सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करतील. कदाचित, मोठे धागेदोरे मिळाले असतीलही! एव्हाना तो हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलाही असेल. सैफवरील हल्ला ही गंभीर आणि दुर्दैवी बाब नक्कीच आहे. असे हल्ले, चोऱ्या, दरोडे होणे चुकीचेच किंवा निषेधार्ह. परंतु असे घडले म्हणून लगेच काही लोकांना आजकाल असुरक्षित वाटू लागले आहे. यात राजकारण आणले गेले असावे.

विरोधक वाटच बघत असावेत !

फडणवीस सरकारवर, मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त करण्याऐवजी किंवा अशा घटना टाळण्यासाठी यंत्रणांवर सामाजिक दबाव निर्माण करण्याऐवजी हे लोक सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात आणि लगेच दोष देण्यास सुरुवात करतात. सैफवरील हल्ल्याच्या वेळीही तेच झाले. काहीही माहिती नसताना, पोलिसांचा तपास अगदीच प्राथमिक पातळीवर असताना आणि सगळ्या यंत्रणा अंधारात चाचपडत असताना राजकीय नेत्यांनी सरकार आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगेच आरोपांच्या फैरी झाडून आपले तथाकथित कर्तव्य बजावण्यास सुरुवात देखील केली.

या घटनेची चर्चा करताना बॉलीवूडशी संबंधित काही घटनांचा संदर्भ देण्यात आला. मोठा कलाकार गुलशनकुमार यांच्या हत्येपासून अनेक काही उदाहरणे देण्यात आली आणि मुडदे पुन्हा उकरण्याचे उद्योग सुरु झाले. परंतु तेव्हाची परिस्थिती, अंडरवर्ल्डचा गुंतव गेलेला ला सिनेसृष्टीतील पैसा, दाऊद इब्राहिम गँगकडून खंडणी वसुलीसाठी करण्यात आलेले हल्ले, दाऊदच्या इशाऱ्यावर दुबईत जाऊन नाचणारे बॉलीवूडचे कलाकार, असे त्या घटनांचे धागेझकासपैकी विसरण्यात आले. तोच प्रकार गेल्या काही दिवसांत घडलेल्या दोन घटनांच्या बाबतीतही झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी या माजी मंत्र्याचा खून या दोन घटना मुंबईला हादरवून सोडणाऱ्या होत्या, हे मान्य करायला हवे. पण, त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य वाटत नाही. सलमानवरील गोळीबाराचे नेमके कारण माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्याही व्यवसाय आणि एकूणच त्यांची कथित उच्चभ्रू वर्तुळातील विशेषतः बॉलीवूडमधील उठबस कशासाठी होती, याबाबतही संभ्रम आहेच. या दोन्ही घटनांमागे काहीतरी पार्श्वभूमी होती, असे म्हणता येईल, तसा निष्कर्ष निघू शकतो !

त्या घटनांचा संबंध बघा..

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी.. गुन्हेगारी विश्वाकडून झालेल्या हल्ल्यात बळी गेलेले कुठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याशी जुळलेले होते. कुठेतरी संगनगमत किंवा व्यवहार होते. अचानक कोणी गैंगस्टर उठला आणि त्याने गोळ्या झाडल्या, असे घडलेले नाही. हे सगळ्यांनाच माहिती असले तरीही होणारा फायदा आमचा आणि त्याची धग लागली तर सरकार आणि पोलीस जबाबदार ही भूमिका घेणाऱ्या राजकारणी आणि अभिनेत्यांना मग एखाद्या चोरट्याच्या हल्ल्यामुळे मुंबई असुरक्षित आणि मुंबई पोलीस नाकर्ते वाटू लागतात, याचे आश्चर्य वाटते.

आता, सैफ अली खानच्या फ्लॅटवरील हल्ल्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून सगळ्यांनी सरकारला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुंबईतील गुन्हेगारी घटनांबाबत गृहमंत्र्यांना किंवा सरकारला शरद पवार यांच्यासारख्या ‘अनुभवी’ नेत्याने जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करावा, हे खरे आश्चर्य आहे. दुसरीकडे त्यांचेच वाचाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याला लगेच सैफचा मुलगा तैमूरशी आणि त्यातून हिंदुत्ववाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला.असाच प्रयत्न पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने केला, याला आपण तरी योगायोग मानायला हवा ! पूजा भट्ट किंवा प्रकाशझोतापासून बरेच लांब असलेल्यांनी प्रतिक्रियेसाठी केलेली घाई कुठेतरी खटकल्याशिवाय राहात नाही. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खूनप्रकरण र गाजत आहे, त्यात प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी अनेकजण नाहीत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना प्रकाशझोतात आल्या, त्यावर कोणी निषेधाचा एक शब्द ट्विट करत नाही.

मुंबईची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाते आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज मुंबईत पकडले जाते. याचाच अर्थ तितके ड्रग्ज मुंबईत दाखल होते. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या मदतीसाठी कोणी चकार शब्द काढत नाही. ड्रग्ज सिंडीकेटचा निषेध करण्याचे धारिष्ट्य कोणातच नाही, तो कितीही मोठा बॉलीवूडचा भाई असला आणि किंग असला तरीही, समाजासाठी काही करण्यासाठी पुढे येण्याच्या काळात फार्महाऊसवर जगापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांनी हे शहर असुरक्षित आहे, असा कांगावा करावा, हे न पटण्यासारखे आहे, राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचे आरोप सुरु आहेत.

मुंबईने भरभरून दिले…

एक विचार करा, की जात, पात, धर्म, पंथ आणि देशाच्याही सीमा न पाळणाऱ्या ज्या शहराने या मूठभर लोकांना भरभरून दिले, त्यांच्या सगळ्या जुमलेबाजीकडे दुर्लक्ष करून मोठे केले, त्यांनीही या शहरातील सुरक्षिततेबद्दल आणि मुंबई पोलिसांबद्दल संशय व्यक्त करावा, हे खेदजनक आहे, हे नक्की!

मुंबईत कोट्यवधी लोक गुण्या गोविंदाने, अतिशय शांततेने राहतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुंबई पोलीस आणि सरकार पार पाडते. चोरी, बलात्कार, दरोडे, हल्ले हे गुन्हे घडायला नकोच. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, हे नक्कीच खरे. पण गुन्हेगारी प्रवृत्ती कोणतेही सरकार आणि कोणतेही पोलीस हद्दपार करू शकत नाहीत. तरीही शहरातील असुरक्षित वाटणाऱ्या काही मूठभर लोकांना सरकारपासून अडचण असते, कधी त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसते. कधी त्यांना इथल्या महापालिकेत अडचणी दिसतात. त्यावेळी अशी कोणती कामे या लोकांना सरकार, पोलीस, महापालिकेकडून करून देणे अपेक्षित असते ? किंवा अशा कोणत्या परवानग्या, परवाने त्यांना हवे असतात. काय असे आहे की त्यांच्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष काहीतरी वेगळे आहे आणि ते त्यांना लपवायचे आहे? उलगडा होताना दिसत नाही.

सध्या सरकारवर विनाकारण होणारी चिखलफेक अनेक प्रश्नांना जन्म देते. अर्थात तेरी भी चूप-मेरी भी चूप असा हा व्यवहार असल्यामुळे पोलिसांवर तोंडसुख घेणाऱ्यांचे काही आतबट्ट्याचे व्यवहार समोर येतील, असे नाही. पण उगाच मुंबई असुरक्षित असल्याची ओरड करून या शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे ठणकावून सांगावेसे वाटते. मुंबई सेफ आहे, काळ्जी करू नका..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. तुमचे धंदे, खंडण्या बंद झाल्यामुळे ती असुरक्षित वाटू लागली आहे एवढेच !

हेही वाचा: सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा रुग्णालयातील फोटो शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय पोस्ट

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button