#CoronaVirus: राज्यात धान्याचा तुटवडा!

जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने जनतेने काळजी करू नये, अशी ग्वाही राज्य सरकारकडून सातत्याने दिली जात असताना राज्यातील अनेक भागांत धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा असला तरी या मालाची वाहतूक करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने तसेच मालाची चढउतार करण्याकरिता मजूर उपलब्ध नसल्याने मुंबई, ठाणे, पुण्यासह विदर्भातील किरकोळ व्यापारी किं वा किराणा मालाच्या दुकानांमध्ये पुरेसे धान्य मिळत नसल्याचे अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. त्यामुळे धान्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत पुरेसा साठा असतानाही गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरास होणारा अन्नधान्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या बरोबरीने धान्याचे दरही वाढू लागले आहेत. करोनाचे संकट निर्माण होताच माथाडी तसेच माथाडी कामगारांनी काम बंद केले. त्यामुळे या बाजारात मालाचे चढ-उतार करण्याचे काम मंदावले असून मुंबई, ठाण्यातून या बाजारात खरेदीसाठी येणारे किरकोळ व्यापारीच त्यांच्या कामगारांमार्फत हे काम करताना दिसत आहेत. तसेच अनेक किरकोळ विक्रेत्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्याने पूर्वीसारखा उठाव नसल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





