वरुणराजाने दोन तास दमदार ‘बॅटिंग’, शहर चिंब भिजले
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली

नागपूर : सतत हुलकावणी देणारा मॉन्सून विदर्भात सक्रीय झाला आहे. शहरात सोमवारी सायंकाळी वरुणराजाने जवळपास दोन ते अडीच तास दमदार ‘बॅटिंग’ केल्याने अख्खे शहर चिंब भिजले. या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
दिवसभर ढगाळ वातावरणाचा खेळ चालल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. सुरुवातीला रिपरिप सुरू झाल्यानंतर हळूहळू पावसाचा वेग वाढत गेला. जवळपास दोन ते अडीच तास शहरात सर्वत्र ‘नॉन स्टॉप’ संततधार बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा : विधानसभेत गोंधळ! काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी निलंबन
छत्र्या व रेनकोटअभावी अनेकांना ओले होतच घरी परतावे लागले. काहींनी मात्र भर पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसामुळे रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. जागोजागी तलाव साचल्याचे दृष्य पाहायला मिळाले. बहुतांश खोलगट भागांमध्ये कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. शहरात रात्री साडेआठपर्यंत ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी
जोरदार पावसामुळे अपेक्षेप्रमाणे शहरातील वर्दळीच्या नरेंद्रनगर, मनीषनगर व लोखंडी पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांची चांगलीच फजिती झाली. पाणी शिरून दुचाकी व चारचाकी वाहने बंद पडल्याने अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला.