विधानसभेत गोंधळ! काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी निलंबन

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज मंगळवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका दिवसासाठी निलंबित केलं. नाना पटोले यांनी विधानसभा सभापतींच्या आसनाजवळ जाऊन आंदोलन केल्याने आणि सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.
सकाळी प्रश्नोत्तराच्या तासानंतर पटोले यांनी भाजपा आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला. या वक्तव्यांचा निषेध करताना नाना पटोले यांनी सभापतींच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी केली आणि संबंधित आमदारांवर कारवाईची मागणी केली. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. विरोधी पक्षातील इतर आमदारांनीही पटोले यांना पाठिंबा देत घोषणाबाजी केली.
हेही वाचा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना वारंवार नियमांचं पालन करण्याची आणि शांत राहण्याची सूचना केली. मात्र, नाना पटोले यांनी सभापतींच्या आसनाजवळील आंदोलन सुरूच ठेवलं. यामुळे नार्वेकर यांनी त्यांना संपूर्ण दिवसासाठी सभागृहातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांच्या वर्तनावर टीका करताना म्हटलं, भावना व्यक्त करणं एक गोष्ट आहे, पण सभापतींच्या आसनाकडे धाव घेणं अयोग्य आहे. पटोले स्वतः माजी सभापती आहेत, त्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा होता. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. दुसरीकडे, नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं, शेतकरी अडचणीत असताना सरकार त्यांच्या बाजूने काहीच करत नाही. उलट, भाजप नेते शेतकऱ्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू.