रायगड आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार
रायगडला रेड अलर्ट, शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर

राष्ट्रीय : रायगड आणि पुणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढलेला दिसत आहे. गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात 134 मिलीमीटर पावससाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.याच पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसंच पुण्यातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून पुणे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील हिंगणे खुर्द येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून प्रचंड गैरसोय होत आहे. पुण्याच्या हांडेवाडीलाही पावसाचा फटका बसला असून हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरातही प्रचंड पाणी साचलं आहे.
दरम्यान रायगडमध्ये पावसाचा जोर वाढत असतानाच कुंडलिक नदीने आता धोका पातळी ओलांडली आहे. सध्या या नदीची पाणी पातळी 24.50 मीटरवर पोहोचली आहे. नदी ची धोका पातळी 23.95 आहे मात्र आता पाणी पातळी 24.10 वर पोचली आहे तर तिकडे आंबा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर 10.20 मी वर पोचली आहे नागोठणे येथील एसटी स्टँड परिसर व छत्रपती शिवाजी महाराज परिसर या परिसरामध्ये सध्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला असून, नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः रोहा, नागोठणे आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा – पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी
नागोठणेत अंबा नदी रस्त्यावर – मुख्य मार्ग बंद
नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून, त्यामुळे नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढल्याने रस्त्यावर पाणी साचलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तासह बॅरिकेटिंग लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. प्रशासन सतर्क असून, नागरिकांना नागोठणे शहरात अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
नाशिकमध्येही पावसाचा जोर वाढला
दरम्यान नाशिकमध्येही सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकला यलो अलर्ट देण्यात आला आहे.