‘डेव्हलपमेंट’ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तोच महाराष्ट्राचा ‘ब्रँड’’; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भाजप आणि महायुतीच्या विजयामागे अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास आहे. ‘डेव्हलपमेंट’ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तोच आज महाराष्ट्राचा ‘ब्रँड’ बनला आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका निवडणूक निकालानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, असा स्पष्ट कौल मतदारांनी दिला आहे. महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याची शक्यता असून, भाजपचे ५१ टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातही आलेले निकाल हे विकासावरचा विश्वास दर्शवतात, असे बावनकुळे म्हणाले. नागपूर हे उपराजधानीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि महाराष्ट्रातील क्रमांक एक शहर आहे.
नागपूरकरांनी विकसित नागपूरसाठी मत दिले असून, जनतेच्या अपेक्षांनाच कौल दिला आहे, असे ते नागपूरबाबत बोलताना म्हणाले. लातूरमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले, तर काँग्रेसने तेथे चांगली कामगिरी केली. चंद्रपूरचा निकाल अद्याप यायचा असून, पाच वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. अमरावतीत भाजपने चांगली लढत दिली असून अंतिम निकालानंतरच स्पष्ट आढावा घेता येईल, असे राज्यातील इतर शहरांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले. ठिकाणी काँग्रेस, एमआयएम किंवा वंचित आघाडी जिंकली, तेथेही तीच यंत्रे होती. मग केवळ पराभव झाल्यावर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे लोकांना पटत नाही.
हेही वाचा – राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान
भाजप पराभव स्वीकारतो, त्यातून शिकतो आणि पुन्हा जिंकतो, मात्र विरोधक पराभव स्वीकारत नाहीत, असा टोलाही ईव्हीएमविषयीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी लगावला. भाजप विजयाचा उन्माद करणार नाही. थोडासा जल्लोष, साधे सेलिब्रेशन होईल, पण जनतेला न पटणारे काहीही होणार नाही, असे त्यांनी विजय साजरा करण्याबाबत बोलताना स्पष्ट केले. ग्रामीण महाराष्ट्रही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असून, पुढील काही दिवसांत चिंतन करून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ५१ टक्के नगरसेवक भाजप व महायुतीचे असतील आणि भाजपला दोन-तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळेल, असा आत्मविश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी ठोस व्हिजन मांडले असून, एकनाथ शिंदे यांच्यासह विकसित मुंबईसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मुंबईला मोठे पाठबळ मिळाले, ते म्हणाले.




