पंतप्रधान नरेंद्र मोदिंचे प्रयागराज येथे महाकुंभमध्ये नुकतेच गंगा स्नान
पंतप्रधान मोदिंची सोमनाथ मंदिराला भेट, विधीवत केली महादेवाची पूजा

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे महाकुंभमध्ये नुकतेच गंगा स्नान केले होते. त्यानंतर त्यांनी सोमनाथ मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरास भेट देऊन रविवार देशवासियांसाठी प्रार्थना केली. गुजरात येथील सोमनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जामनगर येथील वनतारा येथील प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन देशवासियांच्या कल्याणासाठी महादेवाची प्रार्थना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर जुनागढ जिल्ह्यातील गीर वनप्राणी संग्रहालयातील हेडक्वॉटर असलेल्या सासनला भेट दिली. गीर हे आशियातील सिंहाचे माहेरघर म्हटले जाते. सोमवारी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मोदी लायन सफारीला निघतील आणि सासन येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. गुजरातच्या नऊ जिल्ह्यातील ५३ तालुक्यात जवळपास ३० हजार चौरस किलोमीटर परिसरात आशियाई सिंहाचा वावर आहे. तसेच केंद्रीय उपक्रमाचा भाग म्हणून जुनागडच्या नवीन पिपल्या परिसरात २०.२४ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारे वन्यजीवांसाठी राष्ट्रीय संदर्भ केंद्र स्थापन केले जात आहे. त्याशिवाय, संवर्धन प्रयत्नांना चालना देण्यासाठी सासनमध्ये वन्यजीवांचा मागोवा घेण्यासाठी एक उच्च-तंत्रज्ञान देखरेख केंद्र आणि एक आधुनिक रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे, असे सरकारने म्हटले आहे.
‘सिंह सदन’ येथे परतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.राष्ट्रीय वन्यजीव मंडळामध्ये ( NBWL ) लष्करप्रमुख, राज्यांचे प्रतिनिधी, विविध राज्यांचे वन्यजीव विभागांचे अधिकारी आणि वन्य प्राणी संवर्धनांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सदस्य अशा एकूण ४७ सदस्यांचा समावेश आहे.या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सासन येथे महिला वन कर्मचाऱ्यांच्या गटाशी संवाद साधतील असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.