पंचगंगा नदी घाटाला अवकळा, पंचगंगा नदी घाट संवर्धन करण्याची गरज
शहराच्या वैभवात आणखी पडेल भर

कोल्हापूर : पंचगंगा नदीचा कोल्हापुरातील नदी घाट ज्यांनी रेखाटला नाही, असे चित्रकार शहरात विरळच. कारण इथली सायंकाळ म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण असते. जुन्या पद्धतीच्या दगडी पायऱ्यांमुळे नदी घाटाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. मात्र, दरवर्षी येणारे पुराचे पाणी, अस्वच्छता आणि अर्धवट झालेले बांधकाम यामुळे नदी घाटाला अवकळा आली आहे. नदी घाटाचे संवर्धन झाले, तर शहराच्या वैभवात आणखी भर पडेल.
भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या पाच नद्यांनी पंचगंगा बनते. आज दुधाळी नाला आहे तेथे पूर्वी मयुरी नदी होती. या नदीपासून जयंती नदीपर्यंत पंचगंगेला घाट आहे. घाटाच्या दरम्यान कार्तिक स्वामी आणि संगमेश्वर तीर्थ आहे. राजघाट आहे तिथे राजघराण्यातील व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जागा आहे. दुसरे संभाजीराजे, आबासाहेब महाराज, शहाजी महाराज यांच्या कोरीव छत्री आहेत.
ईशान्य कोपऱ्यात तारकेश्वर मंदिर आहे. या शिवाय नदीघाटजवळील पात्रात आणखी काही मंदिरे आणि दीपमाळ दिसते. अगस्ती आणि लोपामुद्रा यांची पाण्यात बुडालेली मंदिरे आहेत. पुढे टेडकीच्या बाजूला सर्वेश्वर आणि नरसिंह मंदिरे आहेत. त्यानंतर पुढे आणखी एक घाट आहे.
हेही वाचा : पेट्रोल ऐवजी नुसते पाणीच! शहरातील पंपावरील धक्कादायक प्रकार
तेथे जयंती नदी पंचगंगेला मिळते. हा परिसर अत्यंत रम्य आहे. नदी काठी असणारे मंदिरांचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आणि मजबूत आहे. वारंवार येणाऱ्या पुराचा मुकाबला या मंदिरांनी केला आहे. येथे एक प्रकारची निरव शांतता असते. सायंकाळी हा परिसर अत्यंत नयनरम्य वाटतो.
पंचगंगा नदी घाटाचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथातही आढळतो. यावरून तो प्राचीन असल्याचे दिसते. या नदी घाटाचे संवर्धन करण्याचा आराखडा तयार केला. मात्र, अद्याप हे पूर्णत्वास गेले नाही. सध्यातरी येथे अस्वच्छता, निर्माल्य, घरातील नको असलेल्या वस्तू, प्लास्टिक, देवाच्या प्रतिमा, नारळ टाकलेले दिसतात.
येथील मंदिरे, दीपमाळ यांची पडझड झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता आहे. या ठिकाणी घाट संवर्धनाचे काम पूर्ण झाले. स्वच्छता ठेवली तर हे एक चांगले पर्यटनस्थळ विकसित होऊ शकते. देशभरात अनेक नदी घाट पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जातात. पंचगंगा नदी घाटाचेही संवर्धन करणे आवश्यक आहे. पूर्वापार चालत आलेला हा आपला ठेवा आहे.
वारंवार येणारे पूर, पाऊस याचा सामना करत नदी घाटावरची मंदिरे, दीपमाळ अजून टिकून आहेत. घाटाचे संवर्धन केले गेले, तर हा वारसा टिकेल, शिवाय यातून पर्यटनही वाढणार आहे.
– उदय गायकवाड, हेरिटेज समितीचे सदस्य