आईवडिलांबद्दल अश्लील टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादियाला सुप्रिम कोर्टाचा मोठा झटका!

Ranveer Allahbadia | ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारणाऱ्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला असून शोमधील अश्लील टिप्पणीबद्दल न्यायालयाने त्याला फटकारलं आहे. या प्रकरणामुळे त्याला पुढील काही काळ कोणतेच शोज करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल फटकारलं आहे. “रणवीरच्या मनात काहीतरी खूप घाणेरडं होतं, ते त्याने त्या शोमध्ये ओकलं. अशा वर्तनाचा निषेध करायला हवा. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही. पृथ्वीवर अशी कोणती व्यक्ती आहे का, ज्याला ही भाषा आवडेल? अशी टिप्पणी करणाऱ्याला आम्ही का संरक्षण द्यावं”, असं न्यायालयाने सुनावलं.
हेही वाचा : सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार; राधाकृष्ण विखे पाटील
“तुम्ही वापरलेल्या शब्दांमुळे पालकांना लाज वाटली. बहिणी आणि मुलींना लाज वाटेल, संपूर्ण समाजाला लाज वाटेल. यावरून असे दिसून येते की मन विकृत आहे.. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही,” असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात रणवीर याने अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर चौफेर टीका झाल्यानंतर हा कार्यक्रम यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. अल्लाहबादिया याने माफीही मागितली आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.