भोसरी मतदार संघात विकासकामांचा आढावा अन् जनता संपर्क अभियान!
मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्याचा गौरव

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सक्रीय पुढाकार
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “१२ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची” या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निगडी परिसरात विकासकामांची पाहणी, स्वच्छता अभियान आणि विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.
गुरूवारी, दि.११ जून रोजी सकाळी ९.३० वाजता निगडी बस स्टॉप आणि भक्ती शक्ती मेट्रो स्टेशन येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांना आमदार महेशदादा लांडगे यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांना उपलब्ध होत असलेल्या आधुनिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
त्यानंतर सकाळी १० वाजता अमृता विद्यालय ते साईनाथ नगर या परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशभरात झालेल्या परिवर्तनाचा उल्लेख करत नागरिकांनी स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.

हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा!
यानंतर सकाळी १०.३० वाजता सनराईज टॉवर्स कम्युनिटी हॉल येथे विशेष जनसंपर्क अभियान पार पडले. माता अमृतानंदमयी शाळेसमोरील या कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, गरीब आणि वंचित घटकांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम तसेच देशाच्या विकासासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यांची माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समस्या व सूचनाही जाणून घेण्यात आल्या.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असून जनतेचा विश्वास आणि सहभाग हेच या यशामागील प्रमुख बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सर्व कार्यक्रमांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा आढावा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचला असून विकास आणि जनसेवेचा संदेश अधिक बळकट झाला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि गरीब कल्याणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. केंद्र सरकारच्या जनहिताच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठीही आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांची गती अधिक वाढविणार आहोत. देव-देश- धर्म अभिमान, सेवा, सुशासन आणि जनकल्याण हीच आमची कार्यसंस्कृती असून विकसित भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





