नाशिकमध्ये धबधब्यात अडकले पर्यटक: १७ जणांना वाचवण्यात यश; मात्र एक तरुण गेला वाहून

नाशिक : त्रंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा येथे रविवारी रात्री ८ वाजल्यानंतर काही पर्यटक अडकले होते. रात्री पोलीस, वन विभाग, महसूल यंत्रणा पोहोचली आणि त्यानंतर अडीच वाजेपर्यंत मदतकार्य राबवून १७ पर्यटकांना वाचवल्याची माहिती अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी दिली आहे. मात्र यावेळी एक तरुण धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याला शोधण्याचे काम आज, सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आलं आहे.
धबधब्यात अडकलेल्या सागर झा, शिवम सिंग, विशाल प्रसाद, उज्वल विश्वकर्मा, साबेर शेख, अरविंद चोरडिया, अभिनव शर्मा, जागृती पाटील, सूरज गुजराती, पुनीत विसपुते, शुभम गुजराती, दर्शन बंब, शुभम यादव, शुभम नेवगे, सूरज सिंग, भावना पवार असं वाचण्यात यश आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.
नाशिकमध्ये जोरदार पाऊस
शहर आणि परिसरात रविवारी दुपारी पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. या पावसाने बेसावध नागरिकांची तारांबळ उडवली. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, महिनाभरापासून दारणा धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला असून, पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना माल खराब होऊ नये, याकरीता धावपळ करावी लागली. सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या कालावधीत ६.४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. पालखेड धरण समूहातील दारणा धरणातून सुमारे महिनाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने अखेर महिनाभरानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजता दारणा धरणातून २५० क्युसेकने सुरू असलेला विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पालखेडमधून ४०५, वालदेवीतून ३०, भोजापूरमधून १३९ तर नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३,१५५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
नदीपात्रात अडकली वाहने
वाघाडी नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने हे पाणी गोदावरी नदी पात्रात मिसळले. त्यामुळे गाडगेमहाराज पुलाजवळील गोदावरी नदीपात्रात रविवारी सायंकाळी पूरस्थिती निर्माण झाली. वाहनतळात उभ्या असलेल्या एका रिक्षासह कार प्रवाहात अडकल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. ही दोन्ही वाहने अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढली. गोदाघाट परिसरात वाहत येणारा वाघाडी नालाही ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा प्रवाहात एक रिक्षा अडकली. रिक्षा वाचविण्यासाठी संबंधितांना कसरत करावी लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.