भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’, की झूल घातलेल्या विरोधकांचा बेंदूर ?

प्रेम सर्वसाधारणपणे सर्व प्राणीमात्रांवर, मुक्या जनावरांवर करावे, त्यांच्याशी सहानुभूतीने वागावे असे संतांनी, धर्म वचनात सांगितले आहे आणि कोणत्याही संवेदनशील माणसाला पटेल असा हा उपदेश आहे. त्यातही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतीवर आधारित आहे. आजही यांत्रिक, तांत्रिक प्रगती झाली असली तरी बैल या प्राण्याकडून शेतीची बरीच कामे करून घेतली जातात. भारतीय सण, उत्सव, बऱ्याचशा परंपरा या निसर्ग, पर्यावरणाशी संलग्न आहेत. आणि पर्यावरणात नाग, बैल आदी जीव शेतीला सहाय्य करणारे आहेत. मदत करणारे आहेत. त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्या साठी नागपंचमी, वसुबारस, पोळा किंवा बेंदूर असे सण महाराष्ट्रात साजरे केले जातात.
बैलाची कातडी ओढलेला मनुष्यप्राणी
साहजिकच, या प्राणिमात्रांबद्दल मनात अनन्य भावना, आदर व्यक्त करणे गरजेचे आहे. मात्र, बैलाची कातडी अंगावर ओढून घेतलेल्या आणि सण उत्सव आहे म्हणून बेंदूरच्या उत्सवात सामील झालेल्या मंडळींना त्यांची खरी ओळख करून दिलीच पाहिजे. दहशतवादाविरोधात हाती घेतलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई या बैलाची कातडी ओढलेल्या मनुष्य प्राण्यांसाठी जो बेंदूर सण झाला आहे, तो स्पष्टपणे उघड केला पाहिजे.
पाकचे नामोनिशान मिटवा..
पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आठवा.. त्याला अचूक, चोख उत्तर दिले पाहिजे, अशीच देशवासीयांची भावना होती. चोख उत्तर याचा अर्थ पाकड्यांवर आक्रमण करून पाकचे नामोनिशाण मिटवून टकणे, असा त्याचा अर्थ होता. अर्थात, आजच्या काळात अशा प्रकारे एखाद्या देशाचे नामोनिशाण मिटवून टाकणे सोपे नाही. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे. लालबहादुर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या काळातही ते घडले नाही, हे लक्षात घ्या !
ते सहा दहशतवादी कोठे आहेत?
मात्र, सध्या सत्तारूढ पक्षाची मंडळी आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळावा, यासाठी चुन चुन के मारुंगा म्हणतात, तर विरोधी पक्षातली मंडळी ते सहा दहशतवादी कुठे आहेत ? आणि ते भारतात शिरले कसे ? असा प्रश्न उपस्थित करून युद्ध पूर्ण होण्यापूर्वीच विजयी रॅली काढता कसे? असे प्रश्न उपस्थित करतात. खरे तर सत्तारूढ आणि विरोधक या दोघांच्याही म्हणण्याला, प्रश्नांना वास्तवात फारसा अर्थ नाही.. त्यांच्या बोलण्यात गांभीर्य नाही..
हेही वाचा : राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध
फक्त टार्गेट दहशतवादी अड्डे !
भारतीय जनता पार्टीने लोकप्रिय केलेला शब्द मराठी नॅरेटीव्ह किंवा फेक नॅरेटिव्ह हा युध्दासंदर्भात विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. भारताने पाकचे दहशतवादी अड्डे आणि शंभरावर दहशतवादी ठार केले आहेत. यापुढे जी चर्चा होईल, ती फक्त द्विपक्षीय चर्चा असेल. अमेरिकेचा त्यात हस्तक्षेप नसेल. युद्धविराम झाला, त्यात अमेरिकेचा सहभाग नाही. ज्यांच्यामुळे हे युद्ध सुरू झाले, ते सहा दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. मात्र, पाकच्या हद्दीच्या आत घुसून त्यांचे लष्करी अड्डे उद्ध्वस्त केले आणि असे करत असताना पाक नागरिकांना कोणतीही इजा केली नाही, हे लष्कराने आणि परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी, परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पाकड्यांचा दहशतवादी बुरखा..
भारताच्या बाजूने काही देशांनी स्पष्ट भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकवर पुराव्यासह आरोप केले आणि जगापुढे पाकड्यांचा खरा चेहरा स्पष्ट व्हावा, यासाठी जगभरात आपल्या देशाची प्रतिनिधी मंडळे पाठवण्यात आली. हे सगळे झाल्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांचे प्रवक्ते वारंवार काही प्रश्न उपस्थित करत आहेत. ज्याचे गांभीर्य त्यांनी घालवले आहे.पाकबरोबर सुरू असलेले युद्ध का थांबवले ? किंवा भारताच्या ज्या भागावर म्हणजेच काश्मीरवर पाकिस्तानने कब्जा केला आहे, तो भाग आपण का सोडवला नाही ? भारताची किती विमाने पाकिस्तानने पाडली? यासह परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान तसेच संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची रणनीती, कूटनीती कशी अयशस्वी ठरली आहे, याचा परिपाठ ही मंडळी दररोज वाचत आहेत, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल !
विशेष अधिवेशन कशासाठी?
या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही त्यांनी केली. ही मागणी म्हणून योग्य असली तरी शरद पवार यांनीच संसदेच्या अशा अधिवेशनात गोपनीय बाबी उघड करता येत नाहीत. त्यामुळे अधिवेशन घेतले न घेतले विरोधकांना जे मुद्दे आणि माहिती पाहिजे ती अधिवेशनात मिळत नाही. हे स्पष्ट केले आहे. शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. वैचारिक दृष्ट्या सत्तारूढ पक्षाचे आणि त्यांचे कितीही मतभेद असले तरी धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत शरद पवार हे देशाच्या व्यवस्थेतूनच आणि यंत्रणेच्या अंमलबजावणीतूनच विरोधकांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !
भाजपाच्या पदरात यश पडू नये, यासाठी..
अर्थात् कारवाई सुरू असताना आणि ते युद्धविरामापर्यंत गेल्यावर भाजपाच्या वाट्याला जे काही पडले आहे, ते यश म्हणून त्यांच्या पदरात पडू नये, यासाठी विरोधकांचा आणि विशेषतः काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे. या कारवाई दरम्यान अमलात आणलेली कूटनीती किंवा नियोजन हे जगजाहीर करून अवलंबले जात नाही. ते परिणामाच्या दृष्टीने दीर्घकालीन मुत्सद्दीपणाचा भाग असतो. अर्थात् राहुल गांधी यांनी भारताच्या गोपनीय बाबी, सरकार, लष्कर किंवा परराष्ट्र मंत्र्यांनीच जाहीर केल्याचे आरोप केला आहे. हल्ला करण्यापूर्वी त्याची सूचना देणे, हा फसलेला रणनीतीचा भाग असल्याचा आरोपही राहुल गांधी यांचा आहे. त्यावरही सरकारच्या वतीने, लष्कराच्यावतीने खंडन केले गेले आहे, हे राहुल यांच्या समजण्यापलीकडचे आहे!
विरोधकांच्या हातात चाव्या..
मात्र, गेल्या चार दिवसात विरोधकांना ‘ऑपरेशन सिंदूर’ पेक्षा आपला ‘बेंदूर’ सण साजरा करायचा आहे आणि त्यामुळे वाटेल ती झूल पांघरून आपली शिंगे रंगवून, पायात चाळ बांधून ही मंडळी आरडाओरडा करत आहेत. विदेशात पाकची पोलखोल करण्यासाठी आणि आपल्या देशाची युद्धजन्य काळातली वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी जी प्रतिनिधी मंडळे पाठवली गेली आहेत, त्यात काँग्रेसची मंडळी पण आहेत. महत्त्वाच्या सर्वच राजकीय पक्षांची मंडळी केवळ त्या मंडळात नव्हे, तर त्या मंडळाचे प्रमुख पद सांभाळत आहेत. त्यांना जे काही सांगण्यात आले, किंवा परदेशात जे मांडायचे आहे, त्याबाबतची सर्व माहिती सरकार, लष्कराकडून दिली गेली आहे. ही मंडळी हुशार आहेत. साहजिकच त्यांना वस्तुस्थिती नक्कीच समजली असेल.
काँग्रेसींना समजावण्यासाठी थरूर हवेत..
खरे तर शशी थरूर यांच्यावर परदेशातल्या मंडळींना समजावून सांगण्यापेक्षा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे , श्रीनेत आणि माध्यमातील कथित विद्वान, पत्रकार, संपादक यांनाच सर्व बाबी समजावून सांगण्याची जबाबदारी द्यायला पाहिजे. अन्यथा, ‘ऑपरेशन सिंदूर’ ची वस्तुस्थिती बाजूला राहील. त्याचबरोबर सत्तारूढ पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींना भारत, पाक चकमकीच्या संदर्भातील युद्धाच्या अनुषंगाने वास्तवाचे ज्ञान, भान देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्यासह रविशंकर प्रसाद आदी ज्येष्ठ मंडळींना नियुक्त केले पाहिजे. सत्तारूढ आणि विरोधकांच्या एकूणच मानसिकतेमध्ये बेंदूर साजरा करण्याची अनावर इच्छा असल्यामुळे, बेंदूर हा सण ते उत्साहाने साजरा करत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य या मंडळींना यावे, एवढीच त्या बळीराजांचा साथी असलेल्या वृषभ राजाकडे प्रार्थना आहे!