मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Eknath Shinde : तीन दिवसांच्या लाँग वीकेंडसह मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. त्यातच ‘मिसिंग लिंक’ कार्यक्रमामुळे काही लेन बंद करण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र वाढत्या वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे संथ झाली. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. ही परिस्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला.
हेही वाचा – ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
हेलिकॉप्टरमधून पाहणी करताना त्यांनी ट्रॅफिक जामची दखल घेतली आणि तात्काळ टोल न घेता वाहने सोडण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसांना प्रत्यक्ष ठिकाणी उभे राहून वाहनांची मुक्त वाहतूक सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, वाहतूककोंडीमुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याचेही समोर आले. घाट परिसरात तीव्र उष्णतेमुळे इंजिन गरम होऊन काही वाहने बंद पडली, त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी दुपारी १ वाजताचा वेळ ठरवण्यात आल्यानेच सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली, अशी नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. उद्घाटनाचा कार्यक्रम अन्य वेळेत ठेवायला हवा होता, असा सूरही नागरिकांमध्ये उमटला.





