अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच.

प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही; अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वत:चा उद्धार करून घेऊन, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार.

मग प्रश्न असा येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय ? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही; कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, ‘ ते मी केले, मी असा चांगला आहे ’, अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो.

हेही वाचा   :    राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध

सबब, ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल, त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की, ‘ देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ’ ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या, तर आपल्या स्वत:वरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच, जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर ‘ मी दुसऱ्याचे काम केले ’ ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.

बोधवचन:- जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button