ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

बाष्कळ अन् वायफळ बडबड, प्रवक्त्यांमध्ये कोण वरचढ ?

सध्या आपल्या राज्याच्या राजकारणात प्रवक्ता पदावर असलेली पक्षाची नेते मंडळी त्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नेमलेली असावीत, असे दिसते. मुळात प्रवक्ता पदाची कार्ये, कर्तव्ये या मंडळींना माहीत नसावीत. आपण पक्षाच्या वतीने काहीही बोलायला तयार आहोत. वाट्टेल ते बोलले तरी चालेल असा काहीसा गैरसमज या मंडळींचा झाला आहे.

बेलगाम, बेछूट आणि बेफाम..

संजय राऊत, अमोल मिटकरी, संजय शिरसाट, विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, नितेश राणे, संजय गायकवाड अशी काही मंडळी आहेत, ज्यांना आपण काय बोलतो, हेच समजत नाही. मात्र, बोलल्याशिवाय राहावत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. थोडक्यात काय, काहीही बोलण्याचा परवाना त्यांना दिला की काय अशी शंका येते.

उचलली जीभ लावली टाळ्याला..

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार, मोदी पुन्हा जिंकणार नाहीत, शिंदे पुन्हा सत्तेवर नसतील, असे दिवे संजय राऊत आणि मिटकरी यांनी लावले आहेत. आपण केवढे, आपला पक्ष केवढा, यापुढे निवडून किती येतील, या सगळ्याचा विचार न करता आपल्या नेत्याची हांजी हांजी करायची, एवढेच या मंडळींना माहिती आहे. मुळात हा प्रकार नेत्यांना तरी आवडतो का हा खरा प्रश्न आहे. पण प्रवक्ते असल्याने दररोज काही ना काही बोललेच पाहिजे असे त्यांना वाटते, ही खरी गंभीर बाब आहे.

नेत्याला खुश करण्याचे डोहाळे..

अमोल मिटकरी या आमदारांनी अजितदादांना पुढच्या वर्षी मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली. काय मजा आहे ना..अहो, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्तेच्या आजूबाजूला बसण्याची स्वबळाची क्षमता नाही, त्या पक्षातील काही बोलघेवड्या व वाचाळ आमदारांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार हे कधी एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे डोहाळे लागतात.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

ही तर ‘सेटलमेंट पार्टी..’

पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने विठू माऊलीचे दर्शन घेऊन पुढच्या वर्षी अजितदादांनी सपत्नीक माऊलींची पूजा करावी, अशी आर्त हाक घातली आहे. याचा अर्थ ‘घरचं झालं थोडं म्हणून व्याहानं घाडलं घोडं’अशी काहीशी चित्र विचित्र अवस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झाली असल्यास त्यात काही नवल नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ख्याती ही ‘सेटलमेंट पार्टी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या पार्टीचा अभ्यास केला असता त्यांना विकासासाठी सतत चाटणाला सत्तेचा मध हवा असतो. तरच जनतेचा विकास त्यांच्या हातून नकळत होतो, अशी त्यांची धारणा आहे. अर्थात् त्यात काही नवल नाही, पण हे सत्तेत असताना त्यांचं चाटण मधाच्या बोटावर थांबत नाही, त्यासाठी त्यांना मधाचं पोळं हवं असतं !

केवळ फुल्या आणि फुल्याच!

त्याशिवाय या पार्टीतील सर्वव्यापी लोकप्रतिनिधींचा सर्वांगीण विकास होतच नाही, हे वास्तव कसं नाकारता येईल, कारण या वास्तव्यामुळेच तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना महिनोंन्महिने तुरुंगात रा हावे लागले ही वस्तुस्थिती आहे.अशा या विपरित परिस्थितीत सुध्दा भाजपा ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना उतरत्या वयात राजकीय धक्का देण्याची अवदसा सुचली. त्यामुळे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन तुकडे झाले. त्यापैकी एक सत्तेच्या मैदानात पडला तर दुसरा तुकडा महाविकास आघाडीचा आधारवड बनला, आता, त्यातील सत्तेचा मघ चाटणाऱ्या अजितदादा पवार यांच्या गटाला लोकसभा निवडणुकीत रायगडचा गड राखता आला. बाकी ठिकाणी केवळ फुल्या अन् फुल्याच..!

काठावर पास झाल्याची अवस्था..

विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या चाळीसच्या घरात..याचा अर्थ काठावर पास झाल्यासारखी गाठता आली, ती सुद्धा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने ! अन्यथा, तिथेच पक्षाचा पुरता बोऱ्या वाजला असता. मिटकरी हे अजित पवार यांना जरी विटकरी वाटत नसले, तरी आम जनतेला त्यांचा जाम वीट आला आहे, हे अजित पवार यांनी लक्षात घ्यावे. नको ती बाष्कळ आणि तितकीच वायफळ बडबड करण्यात मिटकरी यांचा हात कोणीही धरू शकत नाही, अजितदादा यांना सर्व अवगत असताना चाळीस आमदारांचं गाठोडं बांधून कधीच ते आपल्या काकांची बरोबरी करणार नाहीत. कारण, काकांनी असा प्रयोग सत्तेचाळीस वर्षांपूर्वी पुलोदच सरकार स्थापन करताना केला होता. असं राजकीय गणित असताना अमोल मिटकरी यांना अजितदादांनी पुढच्याच वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची सपत्नीक पूजा करावी, असा आदळ कमी आपटीबार जास्त असणारी वेडसर भावना व्यक्त केली आहे.

वीट आलेल्या आमदाराची भावना..

आता या वीट आलेल्या आमदारांची भावना पांडुरंगाने एका कानाने ऐकली अन् लगोलग दुसऱ्या कानाने सोडून सुध्दा दिली. कारण पांडुरंगाच्या मते अजितदादांनी मंत्रालयात दिलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या एका विटेवरच पुढील चार वर्षे स्थितप्रज्ञ उभे राहिले तरी खूप काही आहे. त्यामुळे तर शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वीट आलेल्या आमदाराला महाराष्ट्राचे शिल्पकार वंदनीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रभाव असणारा, याचा अर्थ सिंचन घोटाळ्यात न अडकलेला किंवा शिखर बँक प्रकरणात न गुंतलेला, मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा, असा शालजोडा मारला आहे. एकूणच राऊत किंवा मिटकरी यांना पांडुरंगाने विटेवर उभे असताना बुद्धी द्यावी. कारण, त्यांची ही विठ्ठलाच्या कानात केलेली बडबड एकूण कमरेवरचे हात कानावर ठेवायची वेळ पांडुरंगावर येईल, असे वाटते.

प्रवक्त्यांना कोणीतरी आवरा..

सर्वच पक्षांनी नेमलेले प्रवक्ते अतिशय खालच्या दर्जाचे उद्गार काढतात, त्यात आता भर पडली आहे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांची ! त्यांनी तर विधिमंडळ सदस्यांना षंढ म्हणून हिणवले आहे ! अशा सर्वच प्रवक्त्यांना आवरण्याची गरज असून त्यांना पक्ष नेतृत्वाने लगाम घातला तर महाराष्ट्रातील निम्मे राजकारण योग्य दिशेने जाईल, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button