राज्यात पावसाचा जोर वाढणार? ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांत उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, जुलैच्या महत्त्वाच्या टप्प्यात चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा वादळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
राज्यातील अनेक भागांत गुरुवारपासून (१६ जुलै) विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुढील ३-४ दिवस राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी पावसाच्या हजेरीमुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
‘एल निनो’चा प्रभाव आणि धरणांची स्थिती
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले. जुलैच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली असली, तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंतेत असून अनेक भागांतील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव यंदाच्या संपूर्ण मान्सूनवर राहण्याचा अंदाज असून, या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच व्यक्त केली आहे.
हेही वाचा
विदर्भासह इतर भागांत यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ते २१ जुलै दरम्यान विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः १८ आणि १९ जुलै रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गुरुवारी पावसाची हजेरी लागेल, तर शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे?
सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांना आज हवामाना विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’दिला आहे.





