अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

हेतू शुद्ध ठेवावा.

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली ही असमाधानाला जागा नाही. ‘ नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ’ हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो; जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. ‘ काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, ’ असे भगवंताजवळ मागावे. ‘ आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुन: नाही करणार, ’ असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधुसंतांची निंदा करतात. त्यांना ‘ मीच काय तो एक शहाणा, मोठा,’ असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना ‘मला कुठे दु:ख आहे ?’ असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

‘ देव आहे ’ असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण ‘ मी ’ पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.

बोधवचन:- शुद्ध असावे आचरण। तसेच असावे अंतःकरण। त्यात भगवंताचे स्मरण। हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन॥

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button