नागपुरात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा राडा, दोन गटात दगडफेक
औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नागपूर : औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता या विषयावरुन नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचा आवाहन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. संशयितांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथीनुसार जयंती होती. त्यामुळे नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गट वाद झाला. महल परिसर, चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोक बाहेरुन आली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गाथा सन्मानाची-कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव!
पोलीस दगडफेकीत जखमी
नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही. दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केले. त्यात अनेक पोलीस जखमी झाले आहे. दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत. पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे. दोन जेसीबी जाळण्यात आले आहे. अनेक वाहने जाळली आहेत.
फडणवीस, गडकरी यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील लोकांना शांतता बाळगावी, असे आवाहन केले. नागपुरात तणाव निर्माण होणे, हे दुर्दैवी आहे. नागपूरचा इतिहास शांततेचा राहिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागपूरकरांनी शांतता बाळगून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.