ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

साहित्य संमेलनाचा ‘फार्स’, कुणाच्या चमकोगिरीसाठी ?

नवी दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात आणि झगमगटात 98 वे साहित्य संमेलन पार पडले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर या अध्यक्षा, तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वागताध्यक्ष होते. दरवर्षीप्रमाणे साहित्य संमेलन आले आणि पार पडले.. त्यात नेमके काय घडले आणि साहित्याच्या वाढीसाठी, प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी नेमके काय निर्णय घेण्यात आले, कोणते ठराव मंजूर झाले, हे मात्र साहित्यप्रेमींना समजलेच नाही !

चमकोगिरी झाली, साहित्याचे काय?

नेमके कोणाला मिरवण्यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते, याचा उलगडा झाला नसला तरी, ते लपून राहिलेले नाही. ‘ नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे यावेळीही साहित्य संमेलन आले, ज्यांना चमकोगिरी करायची होती, त्यांची करून झाली, निधी घेऊन सरकारच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या साहित्यिकांनी पुन्हा सरकारवरच टीकास्त्रे सोडली, पण यावेळी अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी साहित्याच्या उद्धारासाठी काय करता येईल हे ठरवायला सगळेजण विसरून गेले !

मराठी साहित्याचा दर्जा, पुस्तकांचे खप..

मराठी साहित्य मिळणाऱ्या पुस्तकांच्या दुकानात सहज चक्कर मारली, तर पुस्तकांचे जगनाला भिडलेले दर प्रथम लक्षात येतात. साहित्य खपत नाही, त्यामुळे कमी प्रतींची आवृत्ती, आणि कमी प्रती छापल्यामुळे जास्त किंमत, अशा दुष्टचक्रात मराठी साहित्य सापडले आहे.. पण, त्याच्या प्रचाराची किंवा प्रसाराची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

मिरवण्याची हौस भागवली..

हल्लीच्या बदलत्या जमान्यात ज्याप्रमाणे ‘डेस्टिनेशन मॅरेज’ ला विनाकारण भरपूर महत्व आले आहे. जवळ पैसे बाळगून असलेले नातेवाईक आणि वऱ्हाडी यांना बरोबर घेतात आणि दूर कुठेतरी जाऊन लग्न समारंभ उरकतात, ही हल्लीची जीवनशैली! जेमेतेम पैसे असलेले जवळपास कुठेतरी जाऊन गोतावळ्याच्या साक्षीने लग्न उरकतात..काही राजकारणी सुद्धा आपल्याला पाहिजे असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन एखाद्या ठिकाणी जातात आणि मनातील मुद्दे पटवून देण्यासाठी भाषणाची हौस भागवतात, तसाच प्रकार यावेळीही साहित्य संमेलनात झाला आहे.

साहित्यिक कसले, राजकीय कार्यकर्ते ?

लग्न उरकून घेताना वधू आणि वर अशा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते कोंबून नेले जातात, तोच प्रकार साहित्य संमेलनात झाला. शरद पवारांनी दिल्लीत भरविलेल्या साहित्य संमेलनात जे काही घडले ते अक्षरशः लाजिरवाणे, किळसवाणे आणि केविलवाणे ठरले आहे ही वस्तुस्थिती!

हेही वाचा  : ‘काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण केलं काही नाही’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

थोडक्यात, शरद पवार यांनी त्यांच्या पुणेकर सवंगड्यांच्या भरवशावर आणि संजय नहार यांच्या खांद्यावर अत्यंत खुबीने बंदूक ठेवून तिकडे थेट पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मोदींवरच नेम धरून चाप ओढला, पण पवार यांचा यावेळीही नेम चुकला आणि बूमरँग होऊन हीच गोळी पवारांना स्वतःलाच जखमी करून गेली, हे प्रत्येकाच्या लक्षात आले !

वास्तविक, शरद पवारांनी उभ्या राजकीय हयातीत सतत जे उथळ राजकीय डावपेचांचे कार्यक्रम राबवून एकाच वेळी अनेक गेम केले, एका दगडात अनेक पक्षी मारले, ते दिवस आता पूर्णतः इतिहासजमा झाले आहेत हे पवारांना आता कुणीतरी सांगायला हवे. तरीही पवारांनी नेहमीचे तेच ते पोरकट आणि कारस्थानी गेम खेळून पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे किंवा कोणती बळकट करणे अशी उचापत केली आहे, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

संजय नहार यांच्या खांद्यावर बंदूक

पवारांनी उथळ प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि हपापलेल्या संजय नहार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकाचवेळी स्वतःचे हसे तर करून घेतलेच, पण नहार यांचे थेट देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्याकडे असलेले महत्व कायमस्वरूपी संपवून उघड्या झालेल्या नहार यांना पार नागडे करून ठेवले आहे. कोणाची नाही एवढी नाचक्की नहार यांची झाली आहे.

साहित्य कशाशी खातात?

प्रत्यक्ष साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. ज्यांना साहित्य कशाशी खातात, हे ठाऊक नाही आणि नव्हते, असे जवळपास एक ते दीड हजार पुणेकर म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षातील उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांना आणि नहार यांच्याकडे असलेल्या ‘हौशे- गौशे- नौशे’ मित्रमंडळींना बरोबर घेऊन, पुण्यातून ‘खाणे पिणे’ उरकून आणि पुढे त्यातील अनेकांची ‘सोय’ लावून दिल्लीत साहित्य संमेलनासाठी नेण्यात आले. पण, ही मंडळी ऐनवेळी आपल्याला कशासाठी आणले आहे, हेच विसरून गेल्याचे दिसले.

नरेंद्र मोदींच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या!

नेलेल्या साऱ्यांनी दुर्दैवाने मोदींच्या प्रत्येक महत्वाच्या वाक्यावर टाळ्या पिटल्या, कांहींनी तर शिट्याही फुंकल्या. थोडक्यात, संपलेल्या पवारांनी समस्त साहित्यिकांना अपमान करीत त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीत दिल्लीतल्या साहित्य मंडपात पुण्यातल्या कार्यकर्त्यांना नेऊन त्यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पाडला. तो देखील भाजपाच्या मोदी आणि फडणवीस, यांच्या उपस्थतीत घडवून आणला. पण, अशाने पुन्हा एकदा राजकीय महत्व वाढण्याचे आणि विरोधकांच्या गोटात खळबळ माजविण्याचे पवारांचे डावपेच आता केव्हाच इतिहासजमा झाले आहेत, हे त्यांच्या लक्षात आले आहे.

अत्यंत खळबळजनक म्हणजे हा राजकीय राष्ट्रवादी मेळावा, साहित्यिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भरवला, हे दिल्लीतल्या स्थानिक चाणाक्ष मराठी मंडळींच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणूनच स्थानिक मराठी दिल्लीकर मंडपात फिरकलेच नाहीत, हे लक्षात येण्यासारखे होते.

शिंदेंचा सत्कार फडणवीस मोदींना डिवचण्यासाठी?

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना मुद्दाम पुरस्कृत करून फडणवीस, मोदी यांना खिजवण्याचा, डिवचण्याचा, अस्वस्थ करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला खरा..पण, ते राजकीय कार्यस्थानही उघडे पडले.

मोदींनी मात्र अचूक फायदा उठवला

नरेंद्र मोदींनी या संमेलनात सर्वांदेखत अनेक मुद्दे उपस्थित करून शरद पवार यांना चहूबाजूंनी कोंडीत पकडले. संजय नहार यांनी आणून जमवलेले सारेच मोठ्यांदा टाळ्यांचा कडकडाट करायचे, हे देखील पवार आणि नहार यांच्या लक्षात आले असणार. एखाद्या हिंदी सिनेमात ज्याप्रमाणे एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला मांडवातून उचलून नेतो आणि नवरदेव केवळ हात चोळत बसतो, त्या नवरदेवासारखी अवस्था शरद पवार आणि संजय नहार यांची झाली असेच म्हणावे लागेल!

जमलेले समाजवादी मोदींवर झाले खुश..

जमलेले बहुतेक सारे समाजवादी विचारांचे किंवा हिंदुत्व न मानणारे..मोदी यांना हे नेमके माहीत असल्याने त्यांनी सावरकरांपासून तर संघ आणि हिंदुत्वाचे महत्व सांगितले आणि समाजवाद्यांच्या टाळ्या घेतल्या. शरद पवारांच्या मनात अनेकांबद्दल तिटकारा आहे, पवारांच्या नाकावर टिच्चून हिंदुत्वाचे महत्व जाहीरपणे विशद करून मोदींनी फड जिंकला. पवार – नहारांसह साऱ्यांना अस्वस्थ आणि विचलित करण्याचे काम मोदींनी केले. विरोधकांनी कितीही चक्रव्यूह आखले, तरी त्यांचे दात घशात घालण्याइतके मोदी सक्षम आहेत..अशा अनेक घटना अजून घडायच्या आहेत, पवारांना तोंडावर पाडून मोदींना जिंकायचे आहे..राजकीय खेळ अजून संपलेला नाही, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button