शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल शिवलिंग ढवळेश्वर सन्मानित
शिक्षण विश्व: लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने गौरव

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिक्षण क्षेत्रात शिवलिंग ढवळेश्वर सर हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.14 जून 1962 रोजी जन्म घेतलेले आणि 1984 मध्ये शिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड येथे रुजू झालेले सर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे अत्यंत कठीण परिस्थितीत 1990 साली संत साई विद्यालयाची स्थापना करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी भोसरी परिसरातील विद्यार्थ्यांची धावपळ थांबवली कोणत्याही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता धार्मिक संस्कार आणि राष्ट्रप्रेम जोपासणारी पिढी घडविण्याचे काम त्यांनी गेली चाळीस वर्षे अखंड केले आहे. याबद्दल त्यांचा नुकताच लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने गौरव करण्यात आला.
भोसरी येथील संत साई विद्यालय मनशक्ती केंद्रावर आधारित शिक्षण देणारे हे शहरातील एकमेव विद्यालय असून या कार्यात त्यांच्या पत्नी सुनीता ढवळेश्वर यांचे मोलाचे योगदान आहे. मनःशक्ती प्रेरित शिक्षणातून विद्यार्थ्यांची बुद्धिवर्धन पद्धत आरोग्य वर्तन आणि अभ्यास यांचा समन्वय साधला जातो. परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांना आपले आध्यात्मिक गुरु मानून त्यांनी शाळेत थिंकिंग कौशल्याचा अवलंब केला आहे.नियमित प्राणायाम योग सूर्यनमस्कार वर्ग तसेच योग प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून बाल योगशिक्षक तयार करण्याचे कार्य सातत्याने चालू आहे.
हेही वाचा : ‘मोंथा’ चक्रीवादळ परतले, पण… आजही वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
याबद्दल शिवलिंग ढवळेश्वर म्हणाले, शाळेत आर्मी वेल्फेअर फंडासाठी योगदान, मुलांना सहा भाषांतील प्रतिज्ञा, क्रांती सप्ताह, कन्या पूजन, गुरुपौर्णिमा, मातृ पितृ पूजन दिन, चतुर्थश्रेणी कर्मचारी सत्कार, गणित व विज्ञान प्रदर्शन आणि कला हस्तकला प्रदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना दिली जाते. आज या शाळेला 35 वर्ष पूर्ण झाली असून 2500 हून अधिक विद्यार्थी घडविले गेले आहेत.
ढवळेश्वर सरांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी झाला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, जैन समाजाचा अहिंसा पुरस्कार, भोसरीचे दीपस्तंभ पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, साने गुरुजी विचार साधना पुरस्कार आणि बसवभूषण पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.




