“आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात गेलं आहे” : सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांचा इस्रायलला इशारा
इस्त्राईल-सिरियामध्ये तणावात वाढ; परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान
दमास्कस : सिरियाच्या राजधानी दमास्कसवर इस्रायलने बुधवारी संध्याकाळी केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांनी आपले पहिले सार्वजनिक निवेदन करत इस्रायलला ठणकावून उत्तर दिले – “आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात गेले आहे.” या हल्ल्यामुळे विशेषतः ड्रुझ समुदायामध्ये अस्वस्थता आणि तणाव वाढला आहे. स्वेदा शहरात ड्रुझ समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि सध्या तेथे गंभीर संघर्ष सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
ड्रुझ समुदाय देशाचा आत्मा – अल-शरा
आपल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांनी इस्रायलवर सीरियामध्ये जातीआधारित फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ड्रुझ समुदाय हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.”
त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका, अरब देश आणि तुर्कीच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली गेली आहे. मात्र, त्यांनी चेतावणी दिली की सीरिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला मंजुरी देणार नाही.
हेही वाचा : नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल; विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
“संघर्षांऐवजी संवाद अधिक गरजेचा आहे, पण देशाच्या एकतेवर आघात झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
IDF चा दावा – सैन्य तळांवर हल्ला
दुसरीकडे, इस्रायली संरक्षण दल (IDF) ने सांगितले आहे की, त्यांनी दक्षिण सीरियामधील स्वेदा प्रांतात हल्ले सुरू ठेवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये सीरियन सैन्याच्या चौक्या, लष्करी वाहने, शस्त्रास्त्रांचे गोदामं आणि तळे यांना लक्ष्य करण्यात आले.
IDF ने या हल्ल्यांचे एक व्हिडीओ फुटेजही प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये जड मशीनगनने सुसज्ज बख्तरबंद वाहने व पिकअप ट्रक उडवताना दिसत आहेत. स्वेदा शहर सध्या संघर्षाचे केंद्रबिंदू बनले आहे, जे ड्रुझ समुदायाचा प्रभावशाली गड मानला जातो.
तणावात वाढ; परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान
सध्याच्या घडामोडींचा आंतरराष्ट्रीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मध्यपूर्वेतील स्थैर्य व शांती यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. सीरियातील अंतर्गत संघर्ष, बाह्य हस्तक्षेप आणि धार्मिक-जातीय तणाव यांच्या आघाड्यांवर सीरियाची सरकार व जनता कशी भूमिका घेते, यावर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.





